Published on
:
15 Nov 2024, 10:26 am
Updated on
:
15 Nov 2024, 10:26 am
गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना भाजप बदलणार आहे, असा खोटा प्रचार कॉग्रेस करीत आहे. खरं तर काँग्रेसनेच अनेकदा घटनेची मोडतोड केली. परंतु लोकांना कन्व्हींस करता येत नाही, म्हणून कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज (दि. १५) आष्टी येथे केली.
अहेरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला गडकरी यांनी संबोधित केले. यावेळी धर्मरावबाबा आत्राम, डॉ.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, बाबूराव कोहळे, रमेश भुरसे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री भास्कर बुरे, ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे उपस्थित होते. (Nitin Gadkari)
केशवानंद भारती खटल्यात घटनेची मुलभूत तत्त्व बदलता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तरीही काँग्रेसने विरोधात प्रचार केला. आम्ही घटना बदलणार नाही आणि कोणाला ती बदलूही देणार नाही, असे सांगून गडकरी यांनी घटनेची ऐसीतैसी करुन १९७५ मध्ये आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसचा प्रचार म्हणजे ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’, असा हा प्रकार असल्याची टीका केली. (Nitin Gadkari)
आपल्या प्रयत्नामुळे इंडियन ऑयल देशात इथेनॉलचे चारशे पंप सुरु करणार आहे. भविष्यात पाईपलाईनने गॅस घरपोच मिळणार आहे. येणाऱ्या काही दिवसांत सर्वत्र इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची करण्याचे भाजपचे स्वप्न आहे, असेही गडकरी म्हणाले.
वनाधिकारी हे झारीतील शुक्राचार्य
आपण दळणवळण मंत्री झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांची लांबी वाढवून सुमारे ४ हजार कोटींची कामे केली. परंतु या जिल्ह्यात सर्वाधिक जंगल असल्याने रस्ते निर्माण करताना खूप झाडे तोडावी लागतील, असे कारण पुढे करुन वनाधिकारी अनेक रस्त्यांची कामे अडवून ठेवत आहेत. हे वनाधिकारी झारीतील शुक्राचार्य असून, त्यांना सोडणार नाही, असा दम देत गडकरी यांनी वनाधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करा, असे आवाहन उपस्थितांना केले.