Published on
:
25 Jan 2025, 12:25 am
Updated on
:
25 Jan 2025, 12:25 am
कराड : वाहतुकीचे नियम आणि त्या अनुषंगाने असणारे कायदे बहुतांश वाहन चालकांना माहिती असतात. मात्र, तरीही नियमभंग करीत वाहने चालविणार्यांची संख्या कमी नाही. कराडात वाहतूक पोलिसांनी मागील वर्षभरात वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन करणार्या चालकांवर कारवाईचा बडगा उगारला असून दंडात्मक कारवाई केली आहे. दंडाची ही आकडेवारी कोटीत आहे.
कराड पोलिसांनी मागील वर्षभरात वाहतुकीच्या वेगवेगळ्या कलमांखाली हजारो वाहनांवर कारवाई केली आहे. या वाहनांपैकी दुचाकींवर झालेल्या कारवाईचे प्रमाण सुमारे साठ ते सत्तर टक्के आहे. त्यातही ‘ट्रीपल सिट’ प्रकरणी कारवाई केलेल्या दुचाकींची संख्या जास्त आहे. ‘नो पार्कींग’वरील कारवाईची संख्याही मोठी आहे. तसेच नो एण्ट्री, सिग्नल भंग, विना लायसन्स वाहन चालविणे, मोबाईलवर बोलणे, वाहतुकीला अडथळा करणे, विना हेल्मेट दुचाकीवरुन प्रवास करणार्या चालकांवरही दंडात्मक कारवाई केली आहे. दंडाच्या रकमेचा आकडा कोटीत असून कितीही कारवाई झाली तरी नियमांचे उल्लंघन करणार्यांची संख्या कमी होत नाही, हे दुर्दैव.
सर्वात कमी दंड काळ्या काचेच्या वाहनांवर
चारचाकी वाहनाला ब्लॅक फिल्मिंग म्हणजेच काळी काच असेल तर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. कराडातही अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र, कारवाईचे हे प्रमाण तुलनेने कमी आहे.
सर्वाधिक दंड विना लायसेन्सचा
कराड वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत सर्वाधिक दंड विना लायसन्स वाहन चालविणार्यांना करण्यात आला आहे. अनेक चालक परवाना नसतानाही वाहन चालवितात. तर काहीवेळा लायसन्स सोबत ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते.