कल्याण ग्रामीणमध्ये बदल; नेमकी कारणे काय ?

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

24 Nov 2024, 2:07 pm

Updated on

24 Nov 2024, 2:07 pm

डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील होते. लोकसभा निवडणुकीत डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी रान करणाऱ्या राजू पाटील यांना ही जागा पुन्हा जिंकणे शक्य होते. तथापी पहिल्याच प्रचार सभेत आमदार पाटील यांनी शिंदे पिता-पुत्रांचा एकेरीत उल्लेख करत त्यांची खिल्ली उडवली. विकासाच्या कामांत खोडा तर घातलाच, मात्र प्रचारा दरम्यान लोकसभेत केलेल्या मदतीचे वारंवार दाखले त्यांनी दिले. यातून स्वत:चा मोठेपणा दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न तोकडा पडला. या साऱ्याचा परिणाम मतदारांवर झाला. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून पाहुण्या राजेश मोरे यांना निवडून आणण्याची किमया केली, हे अधोरेखित झाले आहे. यावेळी नशीब घेऊन आलेल्या नवख्या असलेल्या शिवसेनेच्या डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सर्वांचेच आखाडे चुकवून या मतदारसंघात खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने 66 हजार 434 मताधिक्यांची आघाडी घेतली. या मतदारसंघाचे प्रस्थापित असलेले मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यासह ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर या दोघांना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी धक्का दिला आहे. राजु पाटील यांचा पराभव नेमका का झाला? ते नेमके कुठे कमी पडले याबाबतच्या चर्चा सध्या सर्वत्र होत आहेत.

श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामांवर टिका करणे घातक ठरले 

वास्तविक लोकसभा निवडणुकीत मनसे आमदारांनी एका सभेत कार्यकर्त्यांना पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा मेसेज देत काम करण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात ते लोकसभेच्या निवडणुकीत कुठेही दिसले नाहीत. त्यांच्या सोशल मिडीयावरच्या पोस्ट देखील त्यांना मनापासून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे काम करावेसे वाटत नसल्याचे सांगत होत्या मात्र तरीही खासदार डॉ शिंदे यांनी मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे कायमच कौतुक केले होते. वास्तविक कल्याण ग्रामीण मतदार संघात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकास कामांमुळे हा परिसर गोल्डन ट्रगल बनत असताना या विकास कामांना विरोध करत त्यावर टीका करण्याचीच भूमिका घेतली. हीच भूमिका राजू पाटील यांच्यासाठी घातक ठरली. आमदार म्हणून संपूर्ण कारकिर्द डॉ. श्रीकांत शिंदे यांना व त्यांनी केलेल्या कामांना विरोध करण्यातच गेली ही राजू पाटील यांच्यासाठी वजेची बाजू ठरली.

कल्याण लोकसभा निवडणुकीच्यावेळी महायुतीला मनसेचे समर्थन होते. लोकसभा निवडणूक काळात आमदार राजू पाटील यांनी खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी जीवतोड मेहनत घेतली होती. या बदल्यात खा. शिंदे यांनी कल्याण ग्रामीणमधील अनेक विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार पाटील यांना दिले होते. निवडणुकीनंतर खा. डॉ. शिंदे यांंनी शब्द पाळले नाहीत आणि आपला भ्रमनिरास झाला, असे जाहीर सभांमधून आमदार पाटील यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मनसेकडून राजू पाटील यांची कल्याण ग्रामीणमधून उमेदवारी जाहीर झाली. भाजपाचे रविंद्र चव्हाण आणि राजू पाटील यांची मैत्री सर्वश्रृत आहे. डोंबिवली विधानसभेत मनसेने उमेदवार न दिल्याने भाजपा ग्रामीणमध्ये आमदार राजू पाटील यांना साथ देण्याची सज्ज झाली होती. त्याप्रमाणे महायुतीचा धर्म बाजूला ठेऊन भाजपाने निष्ठेने काम केले.

'ती' जाहीर सभा,शिंदे पिता-पुत्रांवर टीका अन्...

शिंदेसेना, भाजपा आणि मनसेच्या ताकदीने कल्याण ग्रामीणचा गड आपण पुन्हा राखू, असा आत्मविश्वास असलेल्या राजू पाटील यांना शिंदे सेनेने आयत्यावेळी राजेश मोरे यांची कल्याण ग्रामीणमधील उमेदवारी जाहीर करताच राजू पाटील यांना धक्का बसला. ठाकरे गटाचे सुभाष भोईर यांच्या मतांचे विभाजन होण्याची गणिते या उमेदवारीने मांडण्यात आली. मोरे यांना उमेदवारी देऊन शिंदे पिता-पुत्रांंनी उपकाराची फेड अपकाराने केल्याची भावना आमदार पाटील यांची झाली. सहजपणे होणाऱ्या निवडणुकीत आव्हान उभे राहिल्याच्या उद्विग्नतेमधून पी अँड टी कॉलनी येथील जाहीर प्रचार सभेत आमदार राजू पाटील यांनी मोरे यांच्या उमेदवारीवर बोलताना शिंदे पिता-पुत्रांची दानतच खोटी आहे, अशी विखारी टीका केली. व्यक्तिगत टीका झाल्याने शिंदे पिता-पु्त्र दुखावले. विशेषता खा. डाॅ. शिंदे यांना हा शब्द जिव्हारी लागला. खासदार डॉ. शिंदे यांनी राजेश मोरे यांची उमेदवारी प्रतिष्ठेची केली. राजू पाटील निवडून येण्याचे आव्हान स्वीकारून मतदानाच्या पाच दिवस अगोदर कल्याण ग्रामीण मतदारसंघात तळ ठोकला. अख्खा मतदारसंघ पिंजून काढला. जोड-तोड आणि फोडा-फोडी करून नाराजांना एका तंबूत आणले. या सर्व उलथापालथीत राजू पाटील आणि सुभाष भोईर यांच्या दुरंगी लढतीचा बेरंग झाला. पाटील आणि भोईर यांनी विभागवार आपले बांधून ठेवलेले मतदार शिंदे सेनेने केलेल्या दाणदाणीमुळे उधळले. सुभाष भोईर आणि राजू पाटील यांचा काही मतदार उलथापालथीमुळे शिंदे सेनेच्या कळपात दाखल झाला. काही दिवसांपूर्वी पाहुणे म्हणून आलेले राजेश मोरे हे खा. शिंदे यांनी दिलेल्या पाठबळामुळे कल्याण ग्रामीणचे पाच वर्षांसाठी वतनदार झाले आहेत.

कल्याण ग्रामीणच्या मतदारांनी बाहेरच्या कोणत्याही उमेदवाराला संधी दिली नाही, मात्र...

सुभाष भोईर आणि राजू पाटील हे दोघेही कल्याण ग्रामीणचे स्थानिक भूमिपुत्र आहेत. गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत आलटूपालटून सुभाष भोईर, रमेश पाटील आणि त्यांचे धाकले बंधू राजू पाटील या तिन्ही मंडळींनीच कल्याण ग्रामीणचे नेतृत्व केले. रहिवाशांनी देखिल स्थानिक भागाची वतनदारी आपल्याच माणसाच्या हातात राहील याची काळजी घेतली. डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक रमेश म्हात्रे यांनी शहरी भागातून येऊन कल्याण ग्रामीणमध्ये आमदार म्हणून आपले नशीब आजमावण्याचा दोनदा प्रयत्न केला. मात्र बाहेरच्या कोणत्याही उमेदवाराला कधीही आपलेसे करण्याचा कल्याण ग्रामीणच्या मतदारांनी प्रयत्न केला नाही. त्याचीच पुनरावृत्ती यंदा होते की काय अशी चिन्हे असतानाच डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना, शासन गुप्त यंत्रणांसह, मतकल आखणीकारांचे अंदाज चुकवून 1 लाख 41 हजार 164 मते घेऊन राजकीय जाणकारांना आश्चर्याचा धक्का दिला.

निष्ठा आणि पक्षीय विचार बाजूला ठेऊन या निवडणुकीत शिंदे शिवसेनेने अमिषांचा महापूर आणला. त्यामुळे ग्रामीणमध्ये नवखे असलेले राजेश मोरे अचानक लाखाहून अधिक मते घेऊन विजयी झाले. हे कोणालाही न पटणारे गणित पैशांच्या खेळामुळे यशस्वी झाले आहे.

मनोज घरत (माजी शहराध्यक्ष, मनसे)

ग्रामीण भागातील मतदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यावर दाखविलेला विश्वास म्हणजे आपला विजय आहे. विरोधकांमध्ये आता विषयच राहिला नसल्याने पैसे वाटपाबरोबर इतर वाट्टेल तसे ते आरोप करत असून हे सर्व चुकीचे आहे. प्रामाणिकपणे काम करून हा विजय प्राप्त केला आहे. विजयासाठी लोकसंंपर्कात जावे लागते. लोकांचे फोन उचलावे लागतात. ते यापूर्वी कधी घडत नव्हते. त्यासाठी हा बदल झाला आहे.

राजेश मोरे ( आमदार, शिंदे सेना )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article