वृद्धांसह ज्येष्ठांचे सकाळीच मतदान
मतदानाच्या पाच दिवसांपूर्वी भारतीय निवडणूक आयोगासह पक्षीय उमेदवारांकडून मतदारांना त्यांचा नावांच्या चिठ्ठ्या घरपोच देण्यात आल्या. तर मतदान केंद्र, भाग क्रमांक, बूथ क्रमांक आणि ठिकाण आदींची माहिती व्हॉट्स ॲपसह मतचिठ्ठ्यामधून देण्यात आली होती. त्यामुळे मतदार सकाळीच स्वयंस्फूर्तीने घरातून बाहेर पडून मतदान केंद्रांवर जात होते. सकाळी सात वाजल्यापासून वृध्द, ज्येष्ठ नागरिक, कामावर जाणारे नोकरदार मतदानासाठी रांगेत होते. मतदारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मतदान केल्यानंतर अनेक मतदार केंद्राजवळ असलेल्या केंद्रात सेल्फी काढत होते. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास परवानगी नव्हती. तरी देखील अनेक जण मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन आले होते. मतदान केंद्रांबाहेर वृध्द, ज्येष्ठ नागरिक यांना पाणी, बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
मतदानासाठी सुट्टी जाहीर केल्यामुळे रांगेत तिष्ठत राहून मतदान करण्यास लागू नये म्हणून अनेक मतदार सकाळीच मतदानासाठी कुटुंबीयांसह बाहेर पडले होते. काही मतदार तर कौतुकाने त्यांच्या लहान मुलांसह, तर काहीजण पाळीव कुत्र्यांसह मतदान केंद्र परिसरात आले होते. दुपारनंतर मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन संथगतीने चालत असल्याच्या तक्रारी मतदारांकडून वाढल्या होत्या. परिणामी मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा देखिल वाढल्या होत्या. मतदान केंद्रांवर महिला, वृध्द, ज्येष्ठ आणि अपंगांना प्रथम प्राधान्याने मतदान करून दिले जात होते. कल्याण ग्रामीणमधील लोकग्रामकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका उमेदवाराचा चार आकडा लिहून प्रचार करण्यात येत होता. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून तो क्रमांक पुसून काढला.
मतदान केंद्रात येणाऱ्या मतदाराकडील चिठ्ठीवर कोणत्याही पक्षाचे चिन्हे नाही याची खात्री करून मगच पोलिस त्यांना मतदानासाठी केंद्रात प्रवेश देत होते. उमेदवार देखिल आपापल्या मतदारसंघांमध्ये जाऊन माहिती घेताना दिसत होते. कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीतील उमेदवार मतदान प्रक्रियेची स्वतः माहिती घेताना दिसत होते. कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढले जात आहे की नाही ? याची खात्री करून घेण्याठी आपल्या मतदारसंघात समर्थकांसह फिरत होते. मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण, पाणी, संध्याकाळी चहाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. लोकसभेच्या निवडणुकीसारखी परिस्थिती यावेळी निर्माण होऊ नये याची विशेष काळजी निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली होती.
सकाळी 11 च्या सुमारास कल्याण पश्चिमेत काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाडामुळे मतदान करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. कल्याण पश्चिमेतील इंद्रप्रस्थ, केडीएमसी मुख्यालय, प्रफुल्ल पॅराडाईज आदी ठिकाणी तांत्रिक बिघाडाची मतदारांकडून देण्यात आली.