नीता केणे यांच्या समवेत तृतीयपंथी मतदारांनी आपली बहिष्काराची भूमिका मागे घेत मतदान केले.Pudhari Photo
Published on
:
20 Nov 2024, 4:54 pm
Updated on
:
20 Nov 2024, 4:54 pm
डोंबिवली : कल्याण पूर्व मतदार संघात पोलिसांसमवेत झालेल्या गैरसमजुतीमधून तृतीयपंथीय समुदायाने विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता. तथापि निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी आणि केडीएमसी अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेअंती सदर प्रकार गैरसमजुतीमुळे घडला असल्याची प्रांजळ कबुली तृतीयपंथी समुदायाच्या जिल्हा आयकॉन नीता केणे यांनी दिली. नीता केणे यांच्या समवेत तृतीयपंथी मतदारांनी आपली बहिष्काराची भूमिका मागे घेत मतदान केले.
पोलिस अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या गैरसमजुतीतून हा प्रकार घडला असून किन्नरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. आणि आज सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आम्हाला मुख्य प्रवाहात आणले जाईल, असा आशावाद नीता केणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तृतीयपंथीय मतदारांची गैरसमजूत दूर करून त्यांस मतदानास प्रवृत्त करण्यासाठी नीता केणे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा मतदार संघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक अमित शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त संजय जाधव, निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ, परिमंडळ- 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी संजय जाधव यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी देखील सदर प्रकरणी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचा परिमाण झाला. बहिष्कार टाकण्याऐवजी आपले बहुमूल्य मत लोकशाहीच्या उत्सवासाठी खर्ची करावे आणि मतदानाचा असलेला हक्क नियमितपणे बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि केडीएमसीच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी तृतीय पंथीयांना केले.