नुकत्याच जन्मलेल्या स्त्री अर्भकाला तिच्या आईने 17 व्या मजल्यावरून फेकून दिल्याची घटना पश्चिमेकडील शंकर हाईट्स फेज-2 येथील डी विंगमध्ये घडली. या घटनेत बाळाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला असून त्याची आई व आजीला ताब्यात घेतले. या हृदयद्रावक घटनेमुळे माता न तू वैरिणी अशा प्रतिक्रिया अंबरनाथमध्ये उमटल्या.
अंबरनाथमधील शंकर हाईट्स या इमारतीत सतराव्या मजल्यावर ही महिला तिच्या आईसह राहते. रात्रीच्या सुमारास तिने एका चिमुकलीला जन्म दिला. त्यानंतर तिने नवजात चिमुकलीला बाथरूममधील इमारतीच्या डक्टमधून बाहेर फेकून दिले. सकाळच्या सुमारास ही बाब स्थानिकांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ स्थानिक लोकप्रतिनिधींना कळवले.
या लोकप्रतिनिधींनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नवजात चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवला. या घटनेनंतर ही महिला व तिच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.