>> बद्रीनाथ खंडागळे
पैठण विधानसभा निवडणुकीत मतांचा वाढलेला टक्का, टळलेले मतविभाजन व थेट लढत या बाबी शिवसेना उमेदवार दत्ता गोर्डे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या ठरणार आहेत. कारण मागील निवडणुकीतही संदिपान भुमरे विरुद्ध दत्ता गोर्डे अशीच लढत झाली होती. परंतु 3, 4 व 5 क्रमांकांच्या उमेदवारांनी एकूण 49 हजार 153 मते घेतल्याने मतांची ही विभागणी भुमरेंच्या पथ्यावर पडली होती. ते 14 हजार मतांनी निवडून आले होते.
जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाची टक्केवारी!
पैठण विधानसभा निवडणुकीत संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हे मिंधे गटातर्फे उभे आहेत. यावेळी तब्बल 77.53 टक्के मतदान झाले आहे. 3 लाख 25 हजार 253 मतदारांपैकी 2 लाख 52 हजार 237 मतदारांनी मतदान केले.
ही विक्रमी टक्केवारी जिल्ह्यातील सिल्लोडनंतर दुसऱ्या क्रमांकाची आहे. पैठण विधानसभा क्षेत्रात यंदा जवळपास 10 हजार परिवर्तनवादी नवीन मतदार नोंदणी झाली. तसेच राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाचा उबग आलेला मतदार परिवर्तनाच्या ‘मूड’मध्ये दिसून आला. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला.
याशिवाय मिंधे गटाच्या फोडाफोडीत संदिपान भुमरे यांनी मुख्य भूमिका निभावली. मतदानाच्या रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीदर्शनाचे प्रयोग झाले. परिणामी यंदाच्या निवडणुकीला धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचे स्वरूप आले. ही परिस्थिती महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार दत्ता गोर्डे यांना सहानुभूती मिळवणारी ठरु शकते.
जात व धर्माच्या वापराशिवायची पहिली निवडणूक…
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 72.55 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फ दत्ता गोर्डे तर शिवसेनेचे उमेदवार म्हणून संदिपान भुमरे यांच्यात लढत झाली होती. दत्ता गोर्डे यांना 68 हजार 987 मते मिळाली. तर संदिपान भुमरे हे 83 हजार 61 मते घेऊन विजयी झाले. दरम्यान विजय चव्हाण यांनी 20 हजार 564, प्रल्हाद राठोड यांनी 17 हजार 192 व धोंडीराम पुजारी यांनी 11 हजार 397 अशी एकूण 49 हजार 153 मते घेतली. या मतविभाजनामुळे भुमरे यांचा विजय झाला.
या पार्श्वभूमीवर पैठण विधानसभा निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच मतविभागणी टळलेली आहे. त्यातच संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हे मिंधे गटातर्फ उभे आहेत. नवीन मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, धनशक्ती विरुद्धचे वातावरण व पहिल्यांदाच जात व धर्म यांच्या वापराशिवाय होणाऱ्या या निवडणुकीत ‘मशाल’ चिन्ह आणि महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार दत्ता गोर्डे यांचा बोलबाला दिसून आला.