Published on
:
14 Nov 2024, 11:40 pm
Updated on
:
14 Nov 2024, 11:40 pm
बंगळूर : भाजपकडून कर्नाटक सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला 50 कोटींचे आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे; तर भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर देताना, काँग्रेस आमदार खरेदी करण्यासाठी ते घोडे किंवा गाढवे आहेत का, अशी टीका करत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, या टीकेवर काँग्रेसने उलटवार करत महाराष्ट्रात भाजपने 42 आमदारांना असेच आमिष दाखवून फोडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे गुरुवारी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.
मे 2023 मध्ये भाजपचा पराभव करून काँग्रेसने कर्नाटकात एकहाती सत्ता स्थापन केली. तेव्हापासून काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न भाजप करत असल्याची टीका होते आहे. आता मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी केलेल्या आरोपाचे समर्थन करताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री संतोष लाड आदींनी आमिष दाखवण्यात आल्याचे वृत्त खरे असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले, काही दिवसांपासून ऑपरेशन कमळ राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपकडून काँग्रेसमधील अनेकांशी संपर्क करण्यात आला होता. त्यांच्यापैकी काहीजणांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना ही कल्पना दिली.
भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोपाबाबत चौकशीची मागणी केली आहे. आमदारांची खरेदी करण्यासाठी ते काय वस्तू नाहीत. अशा प्रकारचे विधान करून सिद्धरामय्यांनी आमदारांचा अपमान केला आहे. त्यांचे आरोप कपोलकल्पित असल्याचे विजयेंद्र यांनी म्हटले आहे.
भाजपने महाराष्ट्राते तेच केले : शिवकुमार
महाराष्ट्रामध्ये 42 आमदारांना पैसे देऊन बंडखोरी करण्यास भाग पाडण्यात आले. त्या आधारे तेथे सरकार स्थापन करण्यात आले. कर्नाटकात काँग्रेसला सत्ता मिळाल्यापासून आतापर्यंत भाजप आणि निजदने सरकार पाडण्याचे प्रयत्न केले, असा पलटवार विजयेंद्र यांच्यावर शिवकुमारांनी केला आहे.