कापूस उत्पादनात घट; दोन वेचणीतच खराटा:खंडाळा परिसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कायम
3 hours ago
1
वैजापूर तालुक्यातील खंडाळासह परिसरात यंदा कापसाचे पीक जोरदार आले होते. शेतकऱ्यांना मोठ्या उत्पादनाची मोठी आशा निर्माण झाली होती, परंतु अधिक प्रमाणात सुरू असलेला पाऊस व वातावरणातील बदलामुळे काही भागात उत्पादनावर परिणाम झाला. कापूस पीक बहरले, परंतु बोंडे कमी लागली असतानाच कापूस वेचणीसाठी लागणारे मजूर मिळत नसल्याने पांढरे सोने संकटात सापडले आहे. तालुक्यातील खंडाळा, बोरसर, भिंगी, नालेगाव, पानगव्हाण, भिवगाव, जानेफळ, हिलालपूरसह काही भागात एक ते दोन वेचणीतच कापसाचा खराटा झाला असल्याचे चित्र बघावयास मिळाले. दुसरीकडे कापसाचे भाव साडेसहा ते सात हजार रुपये क्विंटल आहे. यामुळे कर्ज व उसनवारी करत शेती मशागत, बी-बियाणे, औषध फवारणी, खत, मजुरांवर केलेला खर्चदेखील निघत नाही. कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याने मेटाकुटीला आला आहे. वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु गत दहा वर्षांपासून सात हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आतच भाव असल्याने परिसरात कापसाचे क्षेत्र हळूहळू कमी होत आहे. तालुक्यात चांगला पाऊस झाला असल्याने कापसाचे पीक जोरदार आले, मात्र काही भागांत पावसाचा चांगला, तर काही भागात विपरीत परिणाम कापूस पिकावर झाल्याचे बघावयास मिळाले. पावसाबरोबर वातावरणातील बदलाचा फटकादेखील कापसाला बसला. काढणीसाठी आलेल्या पिकाला मजुरांचा तुटवडा भासत असून शेतकऱ्यांना एक क्विंटल कापूस वेचणीसाठी बाराशे रुपये मोजावे लागत आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)