कोकणात एकूण 39 मतदार संघात बर्याच लढतींमध्ये घराण्यांचा प्रभाव प्रकर्षाने दिसून येत आहे. सिंधुदुर्गात राणे घराणे तर रत्नागिरीत सामंत, रायगडमध्ये पाटील, तटकरे, ठाकूर घराणे तर पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि हितेंद्र ठाकूर घराणे, तसेच नवी मुंबईत नाईक घराण्याचा प्रभाव तर ठाण्यात शिंदेशाहीचा प्रभाव प्रामुख्याने दिसून येत आहे.
घराणेशाहीचा मुद्दा सत्तारुढ आणि विरोधी पक्ष प्रचारात अग्रस्थानी ठेवत असले तरी दोन्ही बाजूंकडून घराणेशाहीतील उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ, कणकवलीत मतदारसंघात नारायण राणे यांचे थोरले आणि धाकटे हे दोन्ही पुत्र रिंगणात आहेत. या जिल्ह्यात पारंपरिक विरुद्ध नवे चेहरे अशी लढत आहे. विद्यमान आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, नितेश राणे हे विद्यमान आमदार आहेत. तर नव्या चेहर्यांमध्ये संदेश पारकर, डॉ. निलेश राणे आणि राजन तेलींचा समावेश आहे. या तीनही मतदार संघात जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.
दुसरा जिल्हा आहे रत्नागिरी. येथे दोन सामंत बंधू रत्नागिरी, राजापुरात उभे ठाकले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत हे रत्नागिरीत उभे आहेत, तर माजी आमदार बाळ माने हे निवडणूक लढवत आहेत. राजापुरात विद्यमान आमदार राजन साळवी यांच्या विरोधात उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या विरोधात शिंदे सेनेचे राजेश बेंडल हे रिंगणात आहेत. तर दापोलीमध्ये रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे रिंगणात आहेत. त्यामुळे घराण्यांचा वारसा पुढे नेणार्यांमध्ये दोन सामंत बंधू आणि योगेश कदम यांचा समावेश आहे. योगेश कदमांना माजी आमदार संजय कदम यांनी आव्हान दिले आहे. तर चिपळूणमध्ये माजी खासदार गोविंदराव निकम यांचे पुत्र शेखर निकम दुसर्यांदा रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून प्रशांत यादव हा नवा चेहरा दिला आहे. रत्नागिरीत सामंत, कदम आणि निकम या तीन घराण्यांतील उमेदवार आपले भविष्य अजमावत आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सुनील तटकरे, जयंत पाटील, रामशेठ ठाकूर या घराण्यांचा प्रभाव पाहायला मिळतो. या तीन घराण्यांपैंकी रामशेठ ठाकूर यांचे पुत्र प्रशांत ठाकूर हे पनवेलमधून चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात शेकापचे बाळाराम पाटील आणि ठाकरे शिवसेनेच्या लीना गरड या उमेदवार आहेत. जयंत पाटील यांच्या स्नुषा चित्रलेखा पाटील या निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात महेंद्र दळवी हे निवडणूक लढवत असून ते शिंदे शिवसेनेचे उमेदवार आहेत. तर श्रीवर्धनमध्ये सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे दुसर्यांदा रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात शरद पवार राष्ट्रवादीकडून अनिल नवगणे, काँग्रेसचे बंडखोर राजा ठाकूर रिंगणात आहेत.
महाडमध्ये काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप रिंगणात आहेत. भरत गोगावले हे विद्यमान आमदार चौथ्यांदा रिंगणात उतरले आहेत. जगताप विरुद्ध गोगावले ही लढत महाडसाठी काँटे की टक्कर मानली जात आहे. याशिवाय कर्जतमध्ये महेंद्र थोरवे विरुद्ध नितीन सावंत आणि अपक्ष सुधाकर घारे अशी तिरंगी लढत आहे. तर उरणमध्ये भाजपचे विद्यमान आमदार महेश बालदी विरुद्ध माजी आमदार मनोहर भोईर विरुद्ध शेकापचे प्रितम म्हात्रे अशी तिरंगी लढत होणार आहे.
तर पेणमध्ये विद्यमान आमदार रवींद्र पाटील विरुद्ध शेकापचे अतूल म्हात्रे, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रसाद भोईर हे रिंगणात आहेत. त्यामुळे ह्या मतदार संघातही रंगतदार लढत आहे. या मतदारसंघात शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील हे भाजपत जावून राज्यसभा खासदार झाले आहेत. त्यांचे वडील मोहन पाटील हे माजी मंत्री होते. त्यांच्यानंतर धैर्यशील पाटील ही धुरा पुढे नेत आहेत. ते राज्यसभेवर गेल्यामुळे विधानसभेच्या रिंगणात नाहीत. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशामुळे महायुतीची ताकद वाढली आहे. रायगड जिल्ह्यात महाड, अलिबाग, कर्जत, उरण या मतदार संघात जोरदार लढती आणि घराण्यांचा प्रभाव पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 18 विधानसभेच्या जागा आहेत. या जिल्ह्यावर मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रभाव अधिक असून त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून खासदार आहेत. या जिल्ह्यामध्ये शिंदे गटाकडून स्वत: एकनाथ शिंदे,विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, प्रताप सरनाईक, डॉ. बालाजी किणीकर हे विद्यमान आमदार पुन्हा निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून संजय केळकर, किसन कथोरे, महेश चौगुले, रवींद्र चव्हाण, मंदा म्हात्रे, गणेश नाईक, कुमार ऐलानी हे विद्यमान आमदार रिंगणात आहेत. नवी मुंबईत नाईक घराण्याचा प्रभाव असून त्यांचे पूत्र संदीप नाईक हे शरद पवार राष्ट्रवादीकडून बेलापूर मधून रिंगणात आहेत. अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून दौलत दरोडा रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून जितेंद्र आव्हाड, सपाचे रईस शेख, बेलापूरमध्ये माजी आमदार संदीप नाईक, कल्याण ग्रामीणमध्ये सुभाष भोईर , ठाण्यामध्ये माजी खासदार राजन विचारे हे प्रमुख चेहरे रिंगणात असून ठाकरे गटाकडून भिवंडी पश्चिम, कल्याण पूर्व, ओवळा-माजिवडा येथे नवीन चेहरे दिले आहेत. शरद पवार गटाकडून ओम कलानी, पांडुरंग बरोडा असे तुल्यबळ उमेदवार शहापूर आणि उल्हासनगरमध्ये रिंगणात आहेत. तर सुभाष पवार हे मुरबाडमधून रिंगणात आहेत. ठाणे जिल्ह्याच्या राजकीय पटलावर शिंदेशाही बरोबरच नाईक घराण्याचा प्रभावही पहायला मिळत आहेत.
कोकणातील पालघर हा पाचवा जिल्हा असून वसई आणि नालासोपारामध्ये हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पूत्र क्षितीज ठाकूर हे बहुजन विकास आघाडीकडून रिंगणात आहेत. तर शिंदेंकडून माजी खासदार राजेंद्र गावीत, माजी आमदार विलास तरे हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार सुनील भुसारा, विनोद निकोले यांच्याबरोबरच जयेंद्र दुबळा, डॉ. विश्वास वळवी हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.
वसईत काँग्रेसचे विजय पाटील, तर भाजपकडून माजी आमदार विवेक पंडित यांची कन्या स्नेहा दुबे-पंडित या रिंगणात आहेत. यांचा सामना हितेंद्र ठाकूर यांच्याशी होणार आहे. तर नालासोपार्यात विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांचा सामना भाजपचे राजन नाईक आणि काँग्रेसचे संदीप पांडे यांच्याबरोबर होणार आहे. पालघर जिल्ह्यामध्ये माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पूत्र डॉ. हेमंत सावरा हे विद्यमान खासदार आहे. त्यामुळे त्यांची भाजपाच्या बाजुने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर भाजपचे माजी खासदार चिंतामण वणगा यांचे पूत्र श्रीनिवास वणगा हेमात्र निवडणूकीतून आऊ ट झाले आहेत. आणि पुन्हा एकदा राजेंद्र गावीत इन झाले आहेत. या जिल्ह्यावरही घराण्यांचा प्रभाव प्रामुख्याने दिसून येत आहे. एकंदरीत कोकणातही सर्वच जिल्ह्यात घराण्यांचा वारसा प्रामुख्याने पुढे येताना दिसत आहे.ो