कोल्हापूर जिल्ह्यात 204 मतदान केंद्रांवर सहानंतरही मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.
Published on
:
21 Nov 2024, 12:48 am
Updated on
:
21 Nov 2024, 12:48 am
कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांत बुधवारी चुरशीने मतदान झाले. मतदानाची वेळ संपल्यानंतरही रांगेत मतदार असल्याने 204 मतदान केंद्रांवर सायंकाळी सहानंतरही मतदानाची प्रक्रिया सुरू राहिली. दरम्यान, जिल्ह्यात 29 बॅलेट युनिट (बीयू), 31 कंट्रोल युनिट (सीयू), 58 व्हीव्हीपॅट तर बॅलेट, कंट्रोल आणि व्हीव्हीपॅट असा एकत्रित संच असे एकूण 8 संच बदलण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
जिल्ह्यात मतदारांनी चुरशीने आणि उत्साहाने मतदान केले. सकाळी सात ते सांयकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. मात्र, काही मतदान केंद्रांवर दुपारनंतर मतदारांची गर्दी वाढत गेली. काही मतदान केंद्रांवर सायंकाळी पाचनंतर गर्दी झाली. यामुळे अशा मतदान केंद्रांबाहेर रांगा होत्या. मतदानाची सायंकाळी सहा ही वेळ संपल्यानंतरही रांगेत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता त्यांना टोकन क्रमांक देऊन, त्यांची मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. रात्री नऊच्या सुमारास अखेरच्या मतदान केंद्रावरील प्रक्रिया पूर्ण झाली.
मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी मॉक पोल (प्रारूप मतदान प्रक्रिया) घेण्यात आली. या प्रक्रियेत 19 बॅलेट युनिट, 23 कंट्रोल युनिट आणि 29 व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाल्याने बदलण्यात आली. यानंतर प्रत्यक्ष मतदान सुरू झाल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे 10 बॅलेट युनिट, 8 कंट्रोल युनिट आणि 29 व्हीव्हीपॅट यंत्रे बदलण्यात आली. यामुळे मतदान प्रक्रियेवर परिणाम झाला नाही, त्यापुढेही मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू राहिली.
चंदगड मतदारसंघात मॉक पोल दरम्यान 2 बीयू, 2 सीयू आणि 6 व्हीव्हीपॅट तर मतदान सुरू झाल्यानंतर 2 बीयू, 1 सीयू आणि 2 व्हीव्हीपॅट, राधानगरी मतदार संघात मॉक पोलमध्ये प्रत्येकी दोन बीयू, सीयू आणि व्हीव्हीपॅट, मतदानादरम्यान एक बीयू, एक सीयू आणि तीन व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. कागल मतदारसंघात मॉक पोल दरम्यान 2 बीयू, 7 सीयू आणि 1 व्हीव्हीपॅट, मतदानादरम्यान 2 बीयू, 2सीयू आणि 4 व्हीव्हीपॅट, कोल्हापूर दक्षिण मतदार संघात मॉक पोल दरम्यान 3 बीयू, 4 सीयू, 5 व्हीव्हीपॅट तर मतदानादरम्यान 6 व्हीव्हीपॅट बदलण्यात आले.
करवीर मतदारसंघात मॉक पोल दरम्यान 2 बीयू, 1 सीयू आणि 1 व्हीव्हीपॅट तर मतदानादरम्यान 2 बीयू, 2 सीयू आणि 7 व्हीव्हीपॅट यंत्र, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मॉक पोल दरम्यान 3 बीयू, 1 सीयू आणि 1 व्हीव्हीपॅट तर मतदानादरम्यान 2 व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. शाहूवाडीत मॉक पोल दरम्यान 1 बीयू, 1 सीयू आणि 2 व्हीव्हीपॅट तर मतदानादरम्यान 1 व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. हातकणंगले मतदार संघात मॉक पोल दरम्यान 3 बीयू, 2 सीयू आणि 4 व्हीव्हीपॅट तर मतदानादरम्यान 2 बीयू, 1 सीयू व 2 व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. इचलकरंजी मतदारसंघात मॉक पोल दरम्यान 1 बीयू, 2 सीयू आणि 4 व्हीव्हीपॅट तर मतदान सुरू झाल्यानंतर 1 बीयू, 1 सीयू आणि 2 व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. शिरोळ मतदार संघात मॉक पोल दरम्यान 1 बीयू आणि 3 व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले.