गोव्यात विश्वविक्रमांचे पर्व, अरुणाचल प्रदेशविरुद्ध गोव्याने रचला इतिहास; 8 धावांच्या सरासरीने 727 धावांचा पाऊस

6 days ago 2

रणजी क्रिकेटमध्ये तळाला असलेल्या गोवा संघाला पर्वरीच्या स्टेडियमवर विश्वविक्रमांचे पर्व अनुभवता आले. कश्यप बाकले आणि स्नेहल कवठणकर जोडीने वैयक्तिक त्रिशतकांसह रणजी क्रिकेट इतिहासातील पहिलीवहिली सहाशतकी भागी रचण्याचा नवा इतिहास रचला. एवढेच नव्हे तर, 2 बाद 727 धावांवर डाव घोषित करणाऱ्या गोव्याने अरुणाचल प्रदेशचा दुसरा डाव 92 धावांत गुंडाळत डाव आणि 551 धावांचा महाप्रचंड आणि विक्रमी विजय नोंदवला.

पर्वरीच्या गोवा क्रिकेट अकादमीच्या मैदानावर एकाच क्षणी विक्रमांचा धोधो पाऊस पडला. निराशाजनक कामगिरीमुळे प्लेट गटात गेलेल्या गोव्याने अरुणाचल प्रदेशविरुद्धचा सामना अवघ्या दीड दिवसातच संपवताना अनेक विश्वविक्रम रचले. काल सुरू झालेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरच्या भेदक माऱ्याच्या जोरावर अरुणाचल प्रदेशचा डाव अवघ्या 84 धावांत गुंडाळला होता आणि त्यानंतर गोव्याच्या पदार्पणवीर कश्यप बाकळे आणि स्नेहल कवठणकर यांनी घणाघाती शतके झळकवत 54 षटकांत 2 बाद 414 अशी जबरदस्त मजल मारली होती. षटकामागे आठ धावांच्या सरासरीने फटकेबाजी करणाऱ्या बाकळे-कवठणकर जोडीने आज दुसऱ्या दिवशीही तोच झंझावात कायम राखत आधी द्विशतके आणि नंतर त्रिशतके झळकवत तिसऱ्या विकेटसाठी 606 धावांची रणजी इतिहासातील सर्वोच्च भागी केली. यानंतर 2 बाद 727 धावांवर डाव घोषित करत 643 धावांची प्रचंड आघाडी घेतली. मग अरुणाचलचा दुसरा डावही 92 धावांत गुंडाळला आणि रणजी इतिहासातला सर्वात मोठा विजय मिळवला.

विश्वविक्रमांचा धुमाकूळ

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच डावात बाकळे आणि कवठणकर जोडीने वैयक्तिक त्रिशतके झळकवण्याचा पराक्रम केला. याआधी केवळ वुर्पेरी रमण आणि ए.जी. कृपाल सिंग यांनी तामीळनाडूकडून खेळताना गोव्याविरुद्ध एकाच डावात त्रिशतके साजरी केली होती.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कवठणकरने 205 चेंडूंत, तर बाकळेने 269 चेंडूंत त्रिशतक पूर्ण केले. हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दुसरे आणि तिसरे वेगवान त्रिशतक ठरले. हैदरबादच्या तन्मय अगरवालने गेल्याच मोसमात 147 चेंडूंत त्रिशतक झळकवण्याचा विश्वविक्रम रचला होता.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणातच त्रिशतक झळकवणारा कश्यप बाकळे दुसराच फलंदाज ठरला. दोन वर्षांपूर्वी बिहारच्या सकीबुल गणीने मिझोरमविरुद्ध पदार्पणातच त्रिशतक झळकवताना 341 धावा केल्या होत्या.

गोव्याने अरुणाचल प्रदेशचा डाव आणि 551 धावांनी पराभव करत रणजी इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदविला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1964-65 च्या मोसमात पाकिस्तान रेल्वेने डेरा इस्माईन खान संघाचा डाव आणि  851 धावांनी पराभव केला होता. हा आजवरचा सर्वात मोठा विजय आहे.

बाकळे (300) आणि कवठणकर (314) या दोघांनीही आपल्या या खेळीत तब्बल 84 चौकार आणि 6 षटकार खेचले. हा एका डावात सर्वात चौकार-षटकारांचा नवा विक्रम आहे.

दुसऱ्यांदा विश्वविक्रम मोडता मोडता राहिला

2006 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कोलंबो (एसएससी) कसोटीत श्रीलंकेच्या कुमार संगक्कारा आणि महेला जयवर्धने यांनी तिसऱ्या विकेटसाठी 624 धावांची विश्वविक्रमी भागी करत कसोटीच नव्हे, तर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च भागी रचली होती. आज गोव्याच्या स्नेहल कवठणकर आणि कश्यप बाकले यांना हा विश्वविक्रम मोडीत काढण्याची सुवर्णसंधी होती. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 606 धावा जोडल्या होत्या, पण तेव्हाच कर्णधार दर्शन मिसाळने 2 बाद 727 धावांवर गोव्याचा डाव घोषित केला आणि हा विश्वविक्रम मोडता मोडता राहिला. यापूर्वी 2016 साली वानखेडेवर खेळल्या गेलेल्या सामन्यात महाराष्ट्राच्या स्वप्निल गुगळे आणि अंकित बावणे यांनी दिल्लीविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी 594 धावांची अभेद्य भागी रचली होती. ते सर्वोच्च भागीच्या विक्रमापासून केवळ 30 धावा दूर असताना कर्णधार गुगळेनेच डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला आणि श्रीलंकन जोडीचा विश्वविक्रम अबाधित राहिला होता. आजही गोव्यानेही तीच पुनरावृत्ती केली.

 लोमरारचेही त्रिशतक

आज रणजी क्रिकेटसाठी त्रिशतकांचा दिवस होता. बाकळे आणि कवठणकरच्या त्रिशतकांपाठोपाठ राजस्थानच्या महिपाल लोमरारनेही 360 चेंडूंत 300 धावांची नाबाद खेळी केली. त्याने या खेळीत 13 षटकार आणि 25 चौकार लगावले. राजस्थानने 7 बाद 660 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला तर उत्तराखंडने दुसऱ्या दिवसअखेर 2 बाद 109 धावा केल्या.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article