चोरट्यांची अवघ्या तीन सेकंदाची करामत:दुचाकीच्या डिक्कीतून साडे 3 लाख रुपये लांबवले, हिंगोलीतील घटना
5 days ago
2
हिंगोली शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या जवाहररोडवर पैसे पडल्याचे सांगत चोरट्यांनी एका दुचाकी वाहनाच्या डिक्कीतून ३.५० लाख रुपयांची रक्कम पळविल्याची घटना मंगळवारी ता. १९ दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मोंढा भागातील व्यापारी गोपाल अग्रवाल यांनी आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास युनीयन बँकेतून ३.५० लाख रुपयांची रक्कम काढली होती. त्यानंतर ते जवाहर रोड भागातील संत नामदेव पतसंस्थे समोर आले. याठिकाणी दुचाकी उभी केली असता एका भामट्याने त्यांच्या पाठीमागे काही अंतरावर ५० रुपयांच्या व २० रुपयांच्या पाच ते सहा नोटा रस्त्यावर टाकून गोपाल अग्रवाल यांना तुमचे पैसे पडल्याचे सांगितले. त्यांनी पाठीमागे पाहिले असता रस्त्यावर काही नोटा पडलेल्या दिल्या. ते पैसे उचलण्यासाठी अग्रवाल दुचाकी सोडून गेले असता त्या ठिकाणी आलेल्या एका भामट्याने त्याच्या दुचाकीच्या बाजूला दुचाकी उभी केली तर दुसऱ्या भामट्याने अग्रवाल यांच्या दुचाकीची डिक्की उघडून त्यातील ३.५० लाख रुपयांची रक्कम पळविली. दरम्यान, रस्त्यावर पडलेल्या नोटा उचलून आलेल्या अग्रवाल यांनी दुचाकीची डिक्की उघडून पाहिले असता त्यातील पैसे गायब झाल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने हिंगोली पोलिसांना माहिती दिली. हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक बनसोडे, परगेवार, जमादार संजय मार्के, अशोक धामने, धनंजय क्षिरसागर, संभाजी लकुळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात भामटे रक्कम पळवित असल्याचे दिसून आले. अवघ्या तीन सेकंदात भामट्यांनी डिक्की उघडून दुचाकीवर पोबारा केल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)