जगद्गुरू संत तुकाराम महाराज जयंती सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात, एकच वारी 2 फेब्रुवारी, स्वागत कमानी, शुभेच्छा फलकांनी सजले खामगाव‎

2 hours ago 2
खामगाव येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने गतवर्षीप्रमाणे या वर्षीही जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. जयंतीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून स्वागत कमानी, शुभेच्छा फलकांनी रजतनगरी खामगाव सजली आहे. मागील अनेक वर्षांपासून शहरात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते. गेल्या वर्षीपासून या सोहळ्याला विशाल स्वरूप आले आहे. यंदा सुमारे १० हजार भाविक सहभागी होतील. या दृष्टीने समितीने नियोजन केले आहे. मागील एक दीड महिन्यापासून जयंती उत्सव समितीकडून नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी गावोगावी बैठका घेवून उत्सव सोहळ्याची माहिती देत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. विशेष म्हणजे श्री संत तुकाराम महाराजांवर श्रध्दा असलेल्या भाविकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हजारो लोकांनी यथाशक्ती सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याचे दिसून येते. २ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता संत तुकाराम महाराज सभागृह नांदुरा रोड, खामगाव येथून संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आणि शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत श्वेत अश्व, संत मंडळी, महिला टाळकरी, पुरूष टाळकरी, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे अशी वेशभूषा असलेला रथ यासह हजारो भाविक सहभागी होणार आहेत. पुरूष मंडळी पांढऱ्या रंगाचे शर्ट, पायजामा आणि टोपी तर महिला भाविक पिवळ्या रंगाची साडी परिधान करून शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. एकंदरित भक्ती सोबतच शिस्तीचे दर्शनही यावेळी घडणार आहे. शोभा यात्रेदरम्यान ठिकठिकाणी पाऊली, रिंगण सोहळा पार पडणार आहे. गायक वादकांच्या साथीने विविध कीर्तन चालींच्या गायनाने संपूर्ण खामगाव शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होईल. शोभायात्रा खामगाव शहरातील मुख्य मार्गाने फिरून नगर परिषद शाळा क्रमांक ६ मध्ये पोहोचेल. या ठिकाणी महाप्रसादाचे वितरण होवून जयंती सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे. या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता पार्किंगची व्यवस्था जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे करण्यात आली आहे. खामगावसह सर्वच ठिकाणांहून भाविकांनी शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे. सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. संग्रहित छायाचित्र. महिला भाविकांसाठी विशेष पावली प्रशिक्षण शोभायात्रेत पावली खेळता यावी, यासाठी शहरातील संत तुकाराम महाराज सभागृहात मागील अनेक दिवसांपासून महिलांसाठी पावलीचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. घाटपुरी येथील मार्के महाराज महिलांना प्रशिक्षण देत आहेत. शहर व परिसरातील अनेक महिला यात सहभागी होवून पावलीचे धडे घेत आहेत. कामगारमंत्री आकाश फुंडकर राहणार उपस्थित जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जयंती उत्सव सोहळ्यााच्या निमित्ताने राज्याचे कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर हे दिवसभर उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज जयंती सोहळ्यासंदर्भात माहिती देण्यासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी यांनी काही दिवसांआधी त्यांची भेट घेतली. यावेळी ना. फुंडकरांनी समितीच्या नियोजनाबद्दल जाणून घेतले. माझ्या वाट्याला जी सेवा येईल, ती करण्यासोबतच सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी समिती पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article