Published on
:
24 Jan 2025, 11:30 pm
Updated on
:
24 Jan 2025, 11:30 pm
वॉशिंग्टन : ‘बड्डे लोग बड्डी बातें’ असे ‘कभी खुशी कभी गम’च्या काजोलच्या थाटात अनेक लोक म्हणत असतात. मात्र या बड्यांच्या प्रत्येक गोष्टीचे आपल्याला कुतूहलही असते हे तितकेच खरेही आहे. अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच शपथ घेतली. ट्रम्प यांच्या शपथविधीला अमेरिकेतील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये राजकीय नेत्यांबरोबरच उद्योग जगतामधील नामवंत व्यक्तीही हजर होत्या. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक बड्या कंपन्या अमेरिकेमध्ये आहेत. या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यात होते. ज्यामध्ये गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, एक्स तसेच टेस्लाचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क, फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग, अॅमेझॉनचे जेफ बेजोस आणि अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांचा समावेश होता. हे सर्व मान्यवर एका रांगेत उभे असल्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या सर्वांच्या संपत्तीचा विचार करता हा फोटो ‘जगातील सर्वात महागडा फोटो’ म्हणून व्हायरल होत आहे. मात्र त्याचबरोबर या टेक जायंटस्पैकी दोघे म्हणजेच सुंदर पिचाई आणि मस्क मोबाईल वापरतानाचाही एक फोटो व्हायरल झालाय. त्यामुळेच हे दोघे नेमका कोणता मोबाईल वापरतात याबद्दलची चर्चा सोशल मीडियावर आहे.
आपल्यासारखे सर्वसामान्य लोक अगदी काही हजारांपासून मिळणारे स्मार्टफोन वापरतात. सर्वसाधारणपणे असल्या फोनची किंमत अगदी 8 हजारांपासून ते जास्तीत जास्त लाखभर रुपयांपर्यंत असते. मात्र श्रीमंत व्यक्तींचे थाट वेगळे असतात तशीच त्यांच्या फोनची निवडही त्यांच्या श्रीमंतीला आणि ‘स्टेटस’ला साजेशी असतेत. म्हणूनच ट्रम्प यांच्या शपथविधीमधील फोटो पाहून मस्क आणि पिचाई नक्की कोणते फोन वापरतात याची चर्चा सुरू झाली. व्हायरल झालेले हे फोटो नीट पाहिल्यास मस्क यांच्या हातात आयफोन असल्याचं दिसून आलं. मस्क यांच्या हातातील फोन ‘आयफोन 16 प्रो’ हे मॉडेल आहे. सध्याच्या घडीला ‘आयफोन 16 प्रो’ हा अॅपलचा फ्लॅगशिप म्हणजेच सर्वात प्रिमिअम आणि कंपनीची ओळख म्हणून प्रमोट केला जणारा फोन आहे. काही महिन्यांपूर्वी म्हणजेच सप्टेंबर महिन्यात हा फोन बाजारात दाखल झाला आहे. भारतामध्ये हा फोन आयफोन 16 प्रो मॅक्सची प्राइज 1 लाख 84 हजार रुपये इतकी आहे. तर 256 जीबीचा हा फोन 1 लाख 37 हजारांना उपलब्ध आहे. सर्च इंजिन, व्हिडीओ आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये अग्रगण्य कंपनी असलेल्या गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोणता फोन वापरतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि ते सुद्धा आयफोन वापरतात असं वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. एकीकडे मस्क हे आयफोन वापरताना दिसत असतानाच त्यांच्या शेजारी उभे राहून आपल्या फोनमध्ये डोकं घालून उभे असलेले सुंदर पिचाई हे त्यांचा फोन तपासत आहेत. सुंदर पिचाईंच्या हातातील फोन हा गुगलचा पिक्सल 9 किंवा गुगल पिक्सल 9 एक्सएल आहे. हा गुगलचा फ्लॅगशिप फोन आहे. पिचाई हे आपल्या कंपनीच्या ब्रँडशी प्रामाणिक असल्याची चर्चा यावरून सुरू झाली! गुगल पिक्सल 9 एक्सएलची किंमत 1 लाख 39 हजार रुपये इतकी आहे.