उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने घरात घुसून तिची छेड काढत विनयभंग केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे तरूणीने त्याला विरोध केल्यानंतर त्या आरोपीने स्वतःची जीभ कापली. या घटनेनंतर तिकडे एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून प्राथमिक उपचारानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.
या संदर्भात पीडित मुलीने आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही संपूर्ण घटना सीतापूरच्या महमुदाबाद भागातील आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडित महिलेने सांगितले की, ती तिच्या खोलीत झोपली होती. तेवढ्यात दरम्यान आरोपी मनोज तिच्या घरात जबरदस्तीने घुसला आणि त्याने तरूणीची छेड काढत विनयभंग केला. आरोपी हा हरदोई जिल्ह्यातील बांदीपूर गावात राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे.
लोकांनी पकडल्यावर जीभच कापली
मात्र पीडितेने त्याला विरोध केला आणि बचावासाठी आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे अनेक लोक तिथे जमा झाले. त्यांनी आरोपीला घेरलं, ते पाहून आरोपी तरूणाने थेट त्याची जीभ कापून कचराकुंडीत फेकली. हे पाहून घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अखेर उपस्थित लोकांनी आरोपी तरुणाला पकडून रुग्णालयात नेले आणि पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.
प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी आरोपी तरुणाला जिल्हा रुग्णालयात पाठवले. कोतवाल अनिल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीवर पोलिस कोठडीत उपचार सुरू आहेत.