Published on
:
21 Nov 2024, 1:05 am
Updated on
:
21 Nov 2024, 1:05 am
कणकवली ः लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आजची निवडणुक आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासून ते शेवटपर्यंत उत्साह पाहिल्यानंतर मुंबईचे चाकरमानी असो किंवा या मतदारसंघातील शेवटच्या गावातील मतदार असो, प्रत्येकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान केले आहे. हे आम्हा सर्वांना अपेक्षित होते. जेवढे जास्त मतदान होते, तेवढा जास्त लोकशाहीवरचा विश्वास पक्का होतो. निश्चितपणे 23 तारीखला त्यावर शिक्कामोर्तब झालेला असेल. माझ्यावर जनतेने टाकलेला विश्वास 23 तारीखला दिसेल, अशी प्रतिक्रिया कणकवली मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
वरवडे-फणसनगर येथील प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क सायंकाळी 5 वा.च्या सुमारास बजावला. यावेळी प्रकाश सावंत, सोनू सावंत, सादिक कुडाळकर, अॅड. अभिजित सावंत, संतोष पुजारे, अशोक राणे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नितेश राणे म्हणाले, या निवडणुकीत लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाला. लोकांची सेवा 10 वर्ष प्रामाणिकपणे आपण करत आलेलो आहे, त्याची जाणीव मतदारांना आहे. माझ्या मतदारसंघातील 263 गावांचा विकास झाला पाहिजे, या हेतूने काम करत आहे. मतदारांनी दाखविलेला विश्वास 23 तारीखला दिसून येईल. त्यामुळे पूर्णपणे समाधानी असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.(Maharashtra assembly poll)