टायर फुटल्याने उसाने भरलेली ट्रॉली पलटली; सुदैवाने जीवितहानी टळली Pudhari
Published on
:
07 Feb 2025, 7:35 am
मंचर: टायर फुटल्याने आणि साठा जीर्ण झाल्यामुळे ऊस वाहतूक करणारी जुगाड ट्रॉली तुटून पलटी झाली. या वेळी सुदैवाने वाहतूक कमी असल्याने जीवितहानी टळली. कळंब (ता. आंबेगाव) येथील पुणे- नाशिक महामार्गावर महाळुंगे फाट्यानजीक गुरुवारी (दि. 6) पहाटे हा अपघात घडला.
अपघातानंतर पूर्ण रस्त्यावर ऊस पसरला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक ग्रामस्थ आणि इतरांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली. रस्त्यावर पसरलेला ऊस दुसरी ट्रॉली आणून त्यामध्ये भरण्याचे काम जवळपास तीन ते चार तास सुरू होते.
बेशिस्त वाहतुकीवर कारवाई गरजेची
ऊस वाहतूक करणा-या वाहनांमध्ये नियमांचे पालन न करता मोठ्या प्रमाणात ऊस भरतात. बहुतांशी ट्रॉली किंवा वाहने जुनी आहेत. त्यांची देखभाल, दुरुस्ती झालेली नसते. टायरही जुने असतात. त्यामुळे असे अपघात होत आहेत. यामध्ये इतर वाहनचालक, प्रवाशांचा जीव टांगणीला लागतो. वाहतूक पोलिसांनी अशा बेशिस्त वाहतुकीवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे. कारखान्यांनी देखील अशा वाहनांची सर्व तपासणी करून मगच ते ऊस वाहतुकीसाठी पाठवावे, अशी मागणी होत आहे.