Published on
:
07 Feb 2025, 9:46 am
Updated on
:
07 Feb 2025, 9:46 am
पालघर : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर निर्माणाधीन सातिवली उड्डाणपुलाच्या गुजरात वाहिनीवरील सर्व्हिस रोडवर आज (शुक्रवार) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. चंद्रकांत सुतार (वय. 32) आणि लक्ष्मी चंद्रकांत सुतार (वय.29) असे मृत दांपत्याची नावे आहेत. हे दोघेही जव्हार तालुक्यातील देहेरे गावचे रहिवाशी होते.
जव्हार तालुक्यातील देहेरे गावाचे रहिवाशी असलेले सुतार दांम्पत्य शुक्रवारी सकाळी दुचाकीवरुन जव्हारच्या दिशेने जात होते. अकरा वाजण्याच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सातिवली येथे पोहोचले असता, निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडवर टाकलेल्या खडीमुळे त्यांची दुचाकी घसरून रस्त्यावर पडली. दुचाकीच्या मागुन येत असलेल्या अज्ञात वाहनाखाली दोघेही चिरडले. गंभीर जखमी झाल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सातिवली येथे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. ठेकेदार निर्मल इन्फ्रा कंपनीकडून सुरू असलेले काम गेल्या आठ महिन्यांपासून उड्डाणपुलाचे काम संथ गतीने केले जात आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे मुख्य मार्गावरील अवजड वाहतूक सर्व्हिस रोडवर वळवण्यात आली आहे. अवजड वाहनांमुळे पावसाळ्यात सर्व्हिस रोडवर मोठया संखेने खड्डे पडले होते.
पावसाळा संपल्यानंतर नवीन सर्व्हिस रोड तयार करण्याऐवजी व्हाईट टॉपिंगच्या कामात निघालेला डांबर मिश्रित खडीचा थर टाकून रस्ता निर्मितीचा सोपस्कार ठेकेदाराकडून पार पाडण्यात आला आहे. डांबर मिश्रित खडीमुळे तयार केलेल्या सर्व्हिस रोडवर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना शुक्रवारी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. सातिवली उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला नवीन डांबरी सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आदेश दिले जात नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. तसेच प्राधिकरणाच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अपघाताच्या पार्श्वभूमीवर सातिवली उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडचे डांबरीकरण करण्याचे निर्देश ठेकेदाराला दिले जातील.
सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण