परभणी/सेलू : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया मधुन तीन लाख रुपये घरी घेऊन जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी सेवानिवृत्त वृध्दाजवळील रोकडची पिशवी बळजबरीने हिसकावुन पळ काढला. ही घटना ६ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास स्वामी विवेकानंद नगर मध्ये घडली. या प्रकरणी सेलू पोलिसात दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, स्वामी विवेकानंद नगर मधील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त स. सचिव देविदास जोगराम चव्हाण यांनी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ च्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया मधुन ३ लाख रुपये काढले. ही रक्कम एका पिशवीत टाकुन अॅटोरिक्षाने ते घरी निघाले. अॅटो घरापर्यंत जात नसल्याने अॅटो थांबुन पैशाची पिशवी हातात घेऊन पायी घराकडे निघाले. यावेळी समोरुन दुचाकीवर दोन अनोळखी इसम त्यांच्या जवळ आले. या इसमांनी देविदास चव्हाण यांच्या जवळील पैशाची पिशवी बळजबरीने हिसकावुन घेत पळ काढला. सदर प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून तपास पोउपनि. भाग्यश्री पुरी करत आहेत. घटनास्थळाला अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी जीवन बेनीवाल, सहाय्यक पोलिस अधिक्षक ऋषीकेश शिंदे, पो.नि. दिपक बोरसे, सपोनि. प्रभाकर कवाळे, पोउपनि. संजय चव्हाण यांनी भेट दिली.