Published on
:
07 Feb 2025, 2:29 pm
Updated on
:
07 Feb 2025, 2:29 pm
नवी दिल्ली : महाराष्ट्रात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा जोरदार सुरु झाल्या आहेत. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ६ खासदार फुटणार असल्याचा दावा केला जात आहे. यादरम्यान, दोन्ही पक्षांत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यात अभद्र शब्दांची देवाण घेवाण झाली आहे.
शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स- संजय राऊत
‘ऑपरेशन टायगर’ विषयी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ऑपरेशन टायगर होईल, ऑपरेशन कमळ होईल. पण ऑलरेडी ऑपरेशन रेडा झालेले आहे. ते अफवा पसरत आहेत. कालच आम्ही आमच्या संसदेच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी आमचे सर्व खासदार उपस्थित होते. संजय राऊत म्हणाले की, यांचे कसले ऑपरेशन टायगर? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज त्यांचे ऑपरेशन करत आहे. रोज त्यांचा अपमान होत आहे. शिंदे गट हा भारतीय जनता पक्षाचा पोटात उगवलेला ॲपेंडिक्स आहे. तो कधीही कापून टाकला जाईल. आमचे ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचे ऑपरेशन फडणवीस करत आहेत, त्याची तुम्ही काळजी घ्या, असा टोला त्यांनी यावेळी शिंदे गटाला लगावला.
ठाकरे गट काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध- नरेश म्हस्के
संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना दिल्लीत नरेश म्हस्के म्हणाले की, महाबंडलेश्वर संजय राऊत यांनी आज सकाळी शिवसेना शिंदे गटावर आरोप केले. ते आम्हाला ॲपेंडिक्स म्हणाले, ते तर पोटात असते. पण आज काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध म्हणजे शिवसेना ठाकरे गट आहे. ते कुठे असते ते मला सांगण्याची गरज नाही. आपण अशा पद्धतीने टीका करत असाल तर आम्हालाही त्या भाषेत उत्तर देता येते, अशा शब्दांत नरेश म्हस्केंनी प्रत्यारोप केले. काँग्रेसच्या झाडावरती संजय राऊत हे बांडगुळाची भूमिका करत आहेत. किती वाईट अवस्था झालेली आहे, राऊत यांना शिपायाचे काम करावे लागत आहे, अशा शब्दांत म्हस्के यांनी राऊतांवर टीका केली. ठाकरे गट हे संपूर्णपणे रिकामा होणार आहे. ठाकरे गटाला घरघर लागली आहे. संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे, एवढीच मंडळी आता तिकडे राहणार आहेत, आगे आगे देखो होता है क्या, असे म्हणत नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.