बिले उचलूनही पाईपलाईनचे काम अर्धवटच; कंत्राटदाराने काम थांबविले!
औसा (Jal Jeevan Mission) : ‘हर घर जल…’, अशी साद घालत जल जीवन मिशन अंतर्गत औसा तालुक्यातील आपचुंदा येथे विहिरीचे काम झाले… पाईपलाईनचे काम अर्धवट राहिले अन् टाकीसाठी खड्डा खोदला तो तसाच कायम आहे. या (Jal Jeevan Mission) कामासाठी सरकारने दिलेले 72 लाख रुपये अशा पद्धतीने चक्क पाण्यातच गेले आहेत. गतिमानी विकासाचे हे मूर्तीमंत उदाहरण विकासाचा राज्यात पॅटर्न निर्माण करणाऱ्या औसा तालुक्यात घालून दिले गेले आहे.
औसा तालुक्यातील आपचुंदा येथे (Jal Jeevan Mission) जलजीवन मिशन अंतर्गत विहीर पाईप लाईन व पाण्याची टाकी अशा तीन महत्त्वपूर्ण कामांचा समावेश असलेल्या योजनेसाठी सरकारने 72 लाख रुपयांची तरतूद केली. या योजनेअंतर्गत कंत्राटदाराने विहिरीचे काम पूर्ण केले मात्र विहिरीपासून गावापर्यंतच्या पाईपलाईनचे काम अर्धवट ठेवले गेले. शिवाय आलेले पाणी साठवण्यासाठी पाण्याची टाकी बांधायची होती म्हणून दोन वर्षांपूर्वी त्यासाठी खड्डा खोदला.
तब्बल चार-पाच फूट खोल असलेला हा खड्डा खोदून दोन वर्षे झाली. त्यात दोन पावसाळे पाण्याचे डोह साचले. मात्र कंत्राटदाराने या ठिकाणी पाण्याच्या टाकीसाठी कुठलेही काम सुरू केले नाही. लोकप्रतिनिधींच्या गळ्यातील ताईत असलेल्या कंत्राटदाराने हे काम घेतल्याने या कंत्राटदार व अधिकाऱ्यांना ‘पटेल’ असेच बोलावे लागते. त्यामुळे दबावापोटी या कंत्राटदाराला अधिकारी हे जाब विचारत नसल्याचे या रखडलेल्या कामावरून स्पष्ट होते.
गेल्या दोन वर्षापासून हे काम बंद असल्याने रखरखत्या उन्हाळ्यात आपंचुंदा ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जाव लागत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘हर घर जल’, देण्यासाठी महत्वाकांक्षी अशी (Jal Jeevan Mission) जलजीवन मिशन योजना ग्रामीण भागातील पाणी प्रश्न मिटावा यासाठी राबवली जात आहे. पण कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे या योजनेचा बट्याबोळ वाजला आहे.
आमदारच उत्तर देऊ शकतील…
या (Jal Jeevan Mission) योजनेचे काम गेल्या दोन अडीच वर्षांपासून रखडल्याने या गाव कारभाऱ्यांना गावातील लोक पाणी योजना कधी होणार? असा प्रश्न करीत आहेत. या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला देता देता या गाव कारभाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. आता आपचुंदेकरांच्या या प्रश्नाला औशाचे कर्तव्यदक्ष आमदार अभिमन्यू पवार हेच उत्तर देऊ शकतील, अशी आशा या परिसरातील लोकांना आहे.
अन्यथा खड्ड्यातच आंदोलन करू!
दोन वर्षांपूर्वी विहिरीचे काम झाल्यानंतर पाईपलाईनचे काम अर्धवट सोडले, पैसे मात्र उचलले. टाकीसाठी दोन वर्षांपूर्वी खड्डा खोदला, मात्र काम सुरूच केले नाही. गावच्या स्मशानभूमीचा रस्ता इथूनच जातो. प्रसंगात लोक येता-जाता काम अर्धवट राहिल्याची चर्चा काढून (Jal Jeevan Mission) ग्रामपंचायतला व आम्हाला बदनाम करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने व जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून तात्काळ काम पूर्ण करावे; अन्यथा आम्ही ग्रामस्थ या खड्ड्यातच आंदोलन करणार आहोत.
– उपसरपंच रामेश्वर कात्रे यांची प्रतिक्रिया