भारतात सोनं या धातुला खूपच किंमत आहे. अनेकांच्या घरात आणि अंगावर थोडं का असेना दागिना पाहायला मिळतो. सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. अडचणीच्या काळात सोनं विकून पैशांचा जमवाजमव केली जाते. त्यात सोन्याचा भाव गगनाला भिडत असल्याचं त्याचं महत्त्व अजून वाढलं आहे. अनेकांना सोनं परिधान करून मिरवायला आवडतं. त्यामुळे जुनं सोडं काढून नव्या डिझाईनने सोनं बनवण्याचा विचार देखील केला जातो. पण जुनं सोन विकताना किंवा ते मोडून नव्या डिझाईनचे दागिने करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जुन्या दागिन्यांवर हॉलमार्किंग नसते. कारण आधी हॉलमार्किंग वगैरे असा काही प्रकार नव्हता. त्यामुळे सोनाराला दागिने विकताना किंवा मोडण्यासाठी देताना आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला जुने दागिने मोडायचे किंवा विकायचे असतील तर सर्वात आधी त्यावर हॉलमार्किंग करून घ्या. यामुळे सोनं किती कॅरेटचं आहे हे कळतं. त्यामुळे विकताना किंवा मोडताना तुम्हाला अंदाज येईल.
हॉलमार्किंग म्हणजे काय?
केंद्र सरकाराने 1 एप्रिल 2023 पासून सोनं खरेदी करताना आणि विकताचा सहा डिजिट हॉलमार्किंग युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) नंबर अनिवार्य केलं आहे. सोन्या्चया दागिन्यावर हॉलमार्किंग हे शुद्धतेचं प्रमाण मानलं जातं. सोन्याची शुद्धता तपासण्याचं काम बीआयएस करतं. हॉलमार्किंग ज्वेलरीवर बीएसआयच्या त्रिकोणी निशाणी असलेला हॉलमार्क लावला जातो. 22 कॅरेटमध्ये 91.66 टक्के सोनं असतं, 18 कॅरेटमध्ये 75 टक्के, 14 कॅरेटमध्ये 58.3 टक्के सोनं असतं. 22 कॅरेटसाठी 916, 18 कॅरेटसाठी 750 आणि 14 कॅरेटसाठी 585 नंबर लिहिलेला असतो.
जुन्या दागिन्यांवर हॉलमार्किंग कशी कराल?
जुन्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणं खूपच सोपं आहे. यासाठी तुम्हाला BIS च्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या शहरातील BIS सेंटरचा पत्ता जाणून घ्या. या सेंटरवर कॅरेट मोजण्याची मशिन लावलेली असते. या मशिनमधून तीन लेयरमध्ये सोन्याची तपासणी होते आणि त्यानंतर सोन्याची शुद्धता आणि कॅरेटबाबत कळतं. त्यानंतर बीएसआयकडून सोन्यावर हॉलमार्किंग केली जाते. जुन्या दागिन्यावर हॉलमार्किंग करण्यासाठी प्रति दागिना तुम्हाला 45 रुपये मोजावे लागतील.