परभणी (Parbhani) :- तालुक्यातील सिंगणापुर जवळ असलेल्या एका पेट्रोलपंप परिसरातील साहित्याला अचानक आग(Fire) लागल्याची घटना गुरुवार ६ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. आगीत गॅस सिलेंडर, ट्रॅक्टर, इंधन कंटेनर व इतर साहित्य जळाले. परभणी अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझविली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
महापालिकेच्या अग्निशमन दलाला गुरुवारी रात्री फोनवर माहिती मिळाली. सिंगणापुर फाटा येथे असलेल्या तिरुपती पेट्रोलपंप परिसरात आग लागली होती. या आगीत गॅस सिलेंडर, ट्रॅक्टर, इंधन कंटेनर असे साहित्य जळाले. जवळपास २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अग्निशमन अधिकारी डि.यु. राठोड, फायरमन अक्षय पांढरे, निखिल बेंडसुरे, वाहन चालक इनायत अली यांनी आग विझविली. दरम्यान अग्निशमन दलातील कर्मचार्यांची सुरक्षा वार्यावर असल्याचे दिसत आहे. पेट्रोलपंप परिसरात लागलेली आग विझविताना अग्निशमनचे जवान, चालक यांना जीव मुठीत धरुन काम करावे लागले. अग्निशमन(fire fighting) मधील काही कर्मचारी कंत्राटीस्तरावर असून काहीजण एजन्सीमार्फत काम करत आहेत. आग विझविताना एखादी अप्रिय घटना घडली तर कर्मचार्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची हा प्रश्न उद्भवते.