रेल्वे कर्मचारी मग तो लोको पायलट असो की रेल्वे मार्गावर देखरेख करणारे ट्रकमॅन असो, त्यांच्या प्रसंगावधानामुळे देशात अनेक अपघात टळले आहेत. धामणगाव रेल्वेजवळ रेल्वे रुळांना तडा गेला होता. रुळांची देखभाल करणाऱया एका ट्रकमॅनच्या हे लक्षात येताच त्याने सुमारे चार किलोमीटर धावत जाऊन येणारी गांधीधाम-पुरी एक्स्प्रेस रोखली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून हजारो प्रवाशांच्या जिवावरचे संकट टळले.
धामणगाव रेल्वे स्थानकाजवळ भोलाराम मीना हे ट्रकमॅन आज सकाळी रेल्वे रुळांची तपासणी करत होते. यावेळी त्यांना एका ठिकाणी रेल्वे रुळांच्या सांध्याच्या ठिकाणी मोठा तडा गेल्याचे आढळले. या मार्गावरून काही वेळातच गांधीधाम-पुरी एक्स्प्रेस जाणार होती. भोलाराम यांनी सुमारे चार किलोमीटर धावत जाऊन ही एक्सप्रेस थांबवली. रेल्वे कर्मचाऱयांचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. त्यानंतर गांधीधाम-पुरी एक्स्प्रेस सुरक्षितपणे या मार्गावरून नेण्यात आली. भोलाराम यांच्या या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
रेल्वे पुरस्कारासाठी होणार शिफारस
कर्तव्यावर असताना प्रसंगावधान दाखवत अपघात टाळणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी भोलाराम यांच्या नावाची शिफारस केली जाण्याची शक्यता आहे.