Published on
:
17 Nov 2024, 10:02 am
Updated on
:
17 Nov 2024, 10:02 am
मोखाडा तालुक्यात बहूतांश प्राथमिक शाळांमधून जुने अभिलेख पुसट व जिर्ण झालेले आहेत. त्यामूळे शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड आदि दाखले मिळविण्यासाठी आदिवासी बांधवांना प्रचंड द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. जातीचा दाखला काढणे, बस प्रवास सवलत आदि सवलतीपासून पारखे रहावे लागत आहे. त्यामूळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जुने अभिलेख जतन व संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
सन 1923 मध्ये जिल्हा स्कूल बोर्ड अस्तित्वात आले व 1947 साली मुंबई प्राथमिक शिक्षण कायदा पास झाला आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक शाळा अस्तित्वात आलेल्या आहेत. दरम्यानच्या काळात टाक आणि दवूत व शाईच्या पेनाचा सर्रास वापर केला जात असे. मात्र शाईच्या पेनाचा वापर केल्याने कालांतराने हे सर्व अभिलेख पुसट झाले आहेत. तर काही पाने वाळवी लागल्याने जिर्ण झालेले आहेत. त्यामूळे शिक्षकांसाठी शालेय दाखले देणे ही एक प्रकारची डोकेदुखी झालेली आहे.
जनरल रजिस्टर हा शालेय अभिलेखांमधील सर्वात महत्वाचा अभिलेख आहे.या रजिस्टर मध्ये आजपर्यंत शाळेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची मूलभूत माहिती जसे की नाव, जन्म दिनांक, प्रवेश दिनांक, पूर्वीची शाळा, आईचे नाव, मातृभाषा, जन्म ठिकाण इत्यादी माहिती नोंदलेली असते. याच रजिस्टरच्या आधारे विद्यार्थ्याला बोनाफाईड दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि रजिस्टर उतारा दिला जातो. त्यामूळेच या अभिलेखाला शाळेचा आणि पर्यायाने विद्यार्थ्यांचा आत्मा म्हणून संबोधले जाते. असे असले तरी त्याचे व्यवस्थित जतन न झाल्याने हा आत्माच आजमितीस गर्भगळीत झालेला आहे.
निर्णय झाला, अंमलबजावणी नाही
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक प्रमाणभूत महत्त्वाचा दस्तावेज आहे. विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसर्या शाळेत प्रवेश घेणे, जातीचा दाखला, पारपत्र मिळवणे व इतर अनेक बाबींसाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. हे प्रमाणपत्र म्हणजे विद्यार्थ्यांची व शाळेची परिपूर्ण ओळख असते. 19 सप्टेंबर 2016 रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार शालेय जनरल रजिस्टर व शाळा सोडल्याचा दाखला यात सुधारणा करण्यात आली आहे. या नवीन शासन निर्णयानुसार जनरल रजिस्टरमध्ये विद्यार्थ्यांच्या मूलभूत माहिती सोबतच त्याचा स्टुडंट आयडी व आधार क्रमांक नोंदणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नमुना जनरल रजिस्टर व शाळा सोडल्याचा दाखला या शासन निर्णयासोबत दिलेला आहे.
आपण सुचवलेली संकल्पना नक्कीच वाखाणण्याजोगी असून दस्तावेज जतन करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.आपण त्यासाठी मार्च महिन्यात आवश्यक तो निधीचा प्रस्ताव सादर करुन त्याची ठोस अंमलबजावणी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करु.
सोनाली मातेकर, जिल्हा शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) शिक्षण विभाग,जि. प. पालघर