अमरावती : अमरावती येथे आयोजित 52 वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे दिमाखदार उद्घाटन राज्यसभा सदस्य खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते बुधवारी (दि.२९) झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख हे होते. या भव्य सोहळ्याला अमरावती चे खासदार बळवंत वानखडे, आमदार किरण सरनाईक तसेच विभागीय उपसंचालक (माध्यमिक) नीलिमा टाके यांची विशेष उपस्थिती होती.
श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख विज्ञान नगरीमध्ये राज्यभरातून आलेले ३३० विद्यार्थी आणि १११ शिक्षक, तसेच प्रयोगशाळा सहाय्यक यांनी आपले नाविन्यपूर्ण संशोधन व प्रयोग सादर केले. या प्रदर्शनामध्ये विज्ञान व गणित प्रकल्पांचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. उद्घाटन समारंभाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोद्वारे पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ही एक अनोखी वैज्ञानिक संकल्पना ठरली. राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूरच्या संचालक हर्षलता बुराडे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर डॉ. जी. व्ही. कोरपे यांनी अभिवादन केले, तर दिलीपबाबू इंगोले यांनी स्वागतपर भाषण दिले. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (NCERT) प्रतिनिधी पुनीत शर्मा यांनी या प्रदर्शनाच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती दिली. प्रदर्शनाचा लोगो अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सभामंडपात झळकवण्यात आला. तसेच डीबीटी स्टार कॉलेज प्रोजेक्ट आणि पी. एम. उषा योजना अंतर्गत महाविद्यालयात नियोजित उपक्रमांची विशेष दिनदर्शिकाही अनावरण करण्यात आली.
21 वे शतक हे भारताच्या प्रगतीचे
खा. डॉ. अनिल बोंडे यांनी उद्घाटनप्रसंगी बालवैज्ञानिकांनी केलेल्या सादरीकरणाचे आणि शिक्षकांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे कौतुक केले. त्यांनी “२१ वे शतक हे भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे असून भारतीय तरुणांना जागतिक स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध होतील” असे प्रतिपादन केले. भारताच्या वैज्ञानिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले आणि शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या योगदानाची आठवण करून दिली. खासदार बळवंत वानखडे यांनी या भव्य प्रदर्शनामुळे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले. आमदार किरण सरनाईक यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी कल्याणासाठी व्हावा, याकडे लक्ष वेधले. त्यांनी आयोजकांनी केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे कौतुक केले.
बालकांनी उद्याचे विज्ञाननिष्ठ, उर्जावान तरुण व्हावे : हर्षवर्धन देशमुख
आजच्या बालकांनी उद्याचे जबाबदार, विज्ञाननिष्ठ आणि उर्जावान तरुण बनून राष्ट्राच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन हर्षवर्धन देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेला या भव्य आयोजनाची संधी दिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आणि सर्व शैक्षणिक संस्थांचे आभार मानले. उद्घाटन समारंभाच्या शेवटी नीलिमा टाके यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. समारंभाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
उद्घाटन सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांसाठी “सायन्स टॉक्स” या विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे डॉ. विवेक पोलशेट्टीवार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे डॉ. प्रकाश इटनकर आणि महिला महाविद्यालय, अमरावतीचे डॉ. अविनाश मोहरील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पुढील पाच दिवस या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन संशोधनांचा अनुभव घेता येईल. दररोज विविध वैज्ञानिक प्रयोग, नवकल्पना आणि शैक्षणिक प्रकल्पांचे सादरीकरण होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना आपली सर्जनशीलता आणि संशोधन कौशल्य दाखवण्याची संधी मिळत आहे. राष्ट्रीय स्तरावर निवड होण्यासाठीही हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या भव्य आयोजनामुळे अमरावती जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नवी ऊर्जा संचारली असून, भविष्यातील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ घडवण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.