संविधानात फक्त दुरुस्ती शक्य, बदल नाही:मंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण, जाधवर ग्रुपतर्फे युवा संसदेचे आयोजन
8 hours ago
2
केवळ राजकीय फायद्यासाठी विरोधकांनी देशाचे संविधान बदलण्यात येणार असल्याचा गैरसमज समाजामध्ये पसरवला. त्याचा काहीसा राजकीय लाभ त्यांना मिळाला आहे, परंतु देशातील लोक अशा अफवांना बळी पडणार नाहीत. देशाचे संविधान कोणालाही बदलता येणार नाही त्यामध्ये केवळ दुरुस्ती करता येते, अशा प्रकारे संविधानामध्ये अनेकदा दुरुस्ती करण्यात आली आहे, असे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स तर्फे आयोजित आठव्या युवा संसदेचे उद्घाटन नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात झाले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर यावेळी उपस्थित होते. संस्थेच्या 'उडान' या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी खासदार अरविंद सावंत यांना आदर्श खासदार पुरस्कार, सुधीर मुनगंटीवार, सत्यजित देशमुख आणि अमित गोरखे यांना आदर्श आमदार पुरस्कार, विठ्ठल काटे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार, सचिन शेलार यांना आदर्श सरपंच पुरस्कार, ॲड. मंगेश ससाणे यांना आदर्श युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राजकारणाबद्दल तळागाळामध्ये द्वेष आणि चीड निर्माण झाली आहे. परंतु अशा प्रकारे राजकारणाबद्दल द्वेष का निर्माण झाला आहे याचाही विचार करणे गरजेचे आहे. अनेकजण आज केवळ पैसा मिळवण्यासाठी राजकारणामध्ये येतात हा विचार सर्वसामान्यांमध्ये रुजला आहे, परंतु राजकारण हे समाजकारण करण्याचे एक साधन आहे. ही भावना आजच्या तरुणांमध्ये रुजवली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने समृद्ध भारत घडू शकेल. राजकारणामध्ये तरुणांनी जाऊ नये हा भ्रम दूर केला पाहिजे, तसेच राजकारण म्हणजे केवळ निवडणूक हा गैरसमजही दूर झाला पाहिजे. निवडणूक हे राजकारणामध्ये येण्याचे केवळ एक माध्यम आहे परंतु निवडणूक म्हणजे राजकारण नाही. भागवत कराड म्हणाले, सशक्त भारत घडविण्यासाठी संस्कारक्षम तरुण पिढीची गरज आहे. आज संस्कारक्षम तरुण घडविण्याचे काम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट शिक्षण आणि युवा संसदेच्या माध्यमातून करत आहे. युवकांनी राजकारणामध्ये निश्चितच आले पाहिजे, परंतु राजकारणामध्ये येताना आपण कशासाठी राजकारणामध्ये येणार आहोत हे स्पष्ट पाहिजे. अन्यथा केवळ पैसा आणि सत्तेसाठी राजकारणामध्ये आलात तर त्या ठिकाणी फार काळ टिकू शकत नाही. अरविंद सावंत म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जात, धर्म, पंथ विसरून समाजासाठी एकत्र यावा, असे आवाहन केले होते. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जात आणि धर्मावरून वाद निर्माण होत आहेत. ही भांडणे लावणारे लोक मात्र सत्तेचा आनंद घेत आहे हे सर्व सामान्य लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. आजचे राजकारण हे सुसंस्कृत राजकारण राहिलेले नाही या राजकारणामधून समाजकारण कधीच दूर गेले आहे. केवळ सत्ता आणि पैसा याचे समीकरण जुळवण्यासाठी आज लोक राजकारणामध्ये येत आहे अशा प्रसंगी सर्वसामान्य माणूस कसा राजकारणामध्ये येऊ शकतो आणि समाजासाठी काम करू शकतो असा प्रश्न निर्माण झाला आहे, परंतु तरीही एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने युवा संसदेच्या माध्यमातून तरुण घडविण्याचे काम केले आहे हे निश्चितच वाखाणण्यासारखे आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)