पाकणी साईडिंग येथून 49 वॅगनचा पहिला पेट्रोलियमचा रेक कर्नाटकमध्ये रवाना करण्यात आला.
Published on
:
30 Jan 2025, 5:56 pm
Updated on
:
30 Jan 2025, 5:56 pm
सोलापूर ः मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने मालवाहतुकीतील महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. पाकणी (ता. उत्तर सोलापूर) येथील साईडिंगमधून आयओसीएल येथे पेट्रोलियम पदार्थाची लोडिंग सुरू झाली आहे. पाकणी येथून 49 वॅगनचा पहिला रेक हायस्पीड डिझेल (एचएसडी) तेल कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील हिरेनंदुरु येथे पाठविला आहे.
28 जानेवारीला ओ सी एल पाकणी सायडींगवर 49 वॅगनचा पहिला बीटीपीएन बोगी टँक पेट्रोलियम रेक लोड केला आहे. सोलापूरमधून आता डिझेल, तेल, इथेनॉल वाहतूक होणार आहे. भारतातील पेट्रोलियम उत्पादनासाठी लॉजिस्टिक आणि वाहतूक सुविधा वाढविण्यात सोलापूर विभागाचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले आहे. मध्य रेल्वेचा सोलापूर विभाग त्यांच्या मालवाहतूक उत्पन्नात आणखीन वाढ करण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक वाढीस हातभार लावण्यासाठी कटिबद्ध आहे.
सोलापूर रेल्वे विभागासाठी मालवाहतूक उत्पन्नात यामुळे मोठी वाढ होणार आहे. लोडिंग पॉईंटच्या अनुषंगाने दरमहा सुमारे 60 रेक लोड केले जातील, असा अंदाज अधिकार्यांनी व्यक्त केला. मोटर स्पीरिड, हायस्पीड डिझेल, इथेनॉल आणि बायोडिझेलसह पेट्रोलियम उत्पादने वाहतूक करणारे रेक रेल्वेच्या महसुलात एका वर्षात 100 कोटींपेक्षा जास्त योगदान देतील, अशी अपेक्षा आहे.