प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये चेंगराचेंगरी होऊन तब्बल 30 जणांचा मृत्यू झाल्याची घटनेने सर्व देश हादरला आहे. अशातच कुंभमेळ्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एकाच कुटुंबातील 10 जण कुंभमेळ्यात मौनी अमावास्येला स्थानासाठी गेले होते मात्र ज्या काकांनी कुंभमेळ्याला जाण्याचा अट्टाहास केला त्यांचाच मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील रुपई दिह गावातील एकाच कुटुंबातील दहा जण मौनी अमावास्येला महाकुंभात स्थानासाठी गेले होते. नानकन (47) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नानकन आपली पत्नी रमा देवी आणि कुटुंबातील काही सदस्य रात्री साडेदहाच्या सुमारास संगम नाक्यावर पोहोचले होते. बारा वाजण्याच्या आत तिथून निघून दोन ते तीन वाजेपर्यंत स्टेशनवर पोहोचायचे असे ठरले होते. 11 पर्यंत स्थान आटपले आणि परतणार एवढ्यात आचानक लोकांची गर्दी आमच्या दिशेने आली. लोकांनी आरडाओरड, किंचाळ्या सुरु केल्या. त्यावेळी पोलीस प्रशासन तिथे दिसलेच नाही. त्यावेळी पुढेही जाता येत नव्हते आणि मागेही वळता येत नव्हते अशी परिस्थिती निर्माण झाली होती.त्या गर्दीतून लोकं एकमेकांवर पाय देऊन मार्ग दिसेल तिथून पळत होते. सत्तर ते ऐंशी लोकं तिथे पडले होते. वीसहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि त्यातच माझे काका नानकन देखिल होते, असा थरार नानकन यांचा पुतण्या जोखुराम याने सांगितला.
नानकन यांनी पत्नी, भाऊ-वहिनी, पुतणे, जावई यांच्यासह मोठ्या उत्साहात मौनी अमावस्या स्नानाचे नियोजन केले होते. मात्र त्यांनाच जीव गमवावा लागला.