Published on
:
07 Feb 2025, 1:45 am
Updated on
:
07 Feb 2025, 1:45 am
दोडामार्ग : सासोली येथे तिलारी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पोट कालव्याला गळती लागली असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या पोट कालव्याची दुरुस्ती करण्याची विनंती तिलारी प्रकल्पाच्या अधिकार्यांना करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र व गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या तिलारी प्रकल्पाच्या कालव्यांची सुमारे 35 वर्षांपूर्वी बांधणी करण्यात आली. हे कालवे शेवटच्या घटका मोजत आहेत. या कालव्याच्या पोट कालव्यांचीही बिकट अवस्था झाली आहे. गोव्याला जाणार्या डाव्या कालव्याच्या सासोली येथील पोट कालव्याला गळती लागली आहे. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या पोट कालव्याद्वारे सासोली, पाटये पुनर्वसन, गोवा आदी भागातील शेतकर्यांना पाणी पुरवठा होतो. सासोली येथे कालव्याला गळती लागल्याने ऐन उन्हाळ्यात आवश्यक पाणी शेतकर्यांना मिळत नसल्याने येथील शेतकर्यांचे मोठे हाल झाले आहेत.
वारंवार फुटणारे कालवे, त्यामुळे शेतकर्यांचे होणारे नुकसान पाहता बिकट बनलेल्या या कालव्यांची नव्याने दुरुस्ती करा. अन्यथा हे कालवे प्रत्येक दिवशी फुटतच राहणार अशी विनंती पाटबंधारे कार्यालयाला केली. मात्र याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे येथील ग्रामस्थ व शेतकर्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पोट कालव्याला लागलेली गळतीची दुरुस्ती तात्काळ करा, अन्यथा त्याच कालव्याखाली उपोषणास बसणार, असा इशारा सासोली ग्रा. पं. सदस्य गुरुदास सावंत, ग्रामस्थ व शेतकर्यांनी दिला आहे.