Published on
:
07 Feb 2025, 4:48 am
Updated on
:
07 Feb 2025, 4:48 am
नागपूर: नवा रोजगार आणि खूप सारे पैसे कमविण्याच्या उद्देशाने अमेरिकेत गेलेल्या एका नागपूरकर युवकाच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. त्याने त्याच्या नातेवाईक, बँकेकडून घेतलेले 50 लाख 49 हजार रुपये वाया गेले. एका एजंटच्या माध्यमातून त्याच्या परदेशवारीचे स्वप्न भंगले. ट्रम्प सरकारमार्फत अमेरिकेत बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या लोकांना देशाबाहेर केले जात आहे. गुरुवारी 106 भारतीयांना घेऊन अमेरिकन सैन्याचे एक विशेष विमान अमृतसर येथे उतरले. यात महाराष्ट्रातील आणि नागपुरातील एका तरुणाचा समावेश आहे.
नागपुरात आल्यानंतर रात्री उशिरा हरप्रितसिंह ललिया यांनी आपली आपबिती माध्यमांसमोर सांगितली. एजेंटकडे त्याने नोव्हेंबरमध्ये आवश्यक कागदपत्रे दिली. त्याला 24 नोव्हेंबरला व्हिसा मिळाला.5 डिसेंबर 2024 रोजी हरप्रित मुंबईतून दुबई अबुधाबी आणि पुढे कॅनडामार्गे अमेरिकेत जाण्यास निघाला परंतु त्याला अबुधाबी येथूनच 6 डिसेंबरला परत पाठविण्यात आले. यानंतर इजिप्तमध्ये नेले गेले तिथून चार दिवस एका जागी कोंडून ठेवले. सामान आधीच दुसरीकडे पाठविले गेले.
माफियाराज आणि मेक्सिको पोलिसांच्या हातमिळवणीतून आणि उंच डोंगर, तारांचे कुंपण, 16 तास पायी चालत,कधी कारमधून अशा खडतर अविरत संघर्षातून डांकीमार्गे अमेरिकेत तो पोहचला खरा मात्र पोलिसांनी त्याला अटक केली हातापायात बेड्या घातल्या. बेकायदेशीर वास्तव्य म्हणून अखेर परत भारतात यावे लागल्याचे त्याने सांगितले. ट्रानसपोर्ट व्यवसाय चालत नसल्याने आपण पर्यायी व्यवसाय,अधिक पैशासाठी तिकडे गेलो मात्र ट्रॅव्हल एजंटने धोका दिला असे हरप्रितने सांगितले. उज्ज्वल भविष्यासाठी इतर तरुणांनी अधिकृत व्हिसा घेऊनच परदेशी जावे, असा सबुरीचा सल्लाही दिला. आता शहर पोलीस या फसवणूक प्रकरणी संबंधितांवर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.