सत्ताधाऱ्यांच्या ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, ज्यांच्यात एकमत नाही, सुसंवाद नाही किंवा विसंवाद सुरू आहे. सरकारमध्ये बहुमतात येऊन सुद्धा रोज नवीन नवीन बातम्या आहेत. अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत. अशा वेळेला या सगळ्या बातम्या सातत्याने दिसत असताना कुठेतरी त्यावरून लक्ष भरकटवायचं म्हणून खासदार फुटणार अशी मुद्दाम कुणीतरी पुडी सोडली आहे, असे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते लोकसभेचे गटनेते खासदार अरविंद सावंत यांनी अफवा पसरवणाऱ्यांचा समाचार घेतला. दिल्लीत शिवसेनेच्या सर्व 9 खासदारांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत विरोधकांना सणसणीत प्रत्युत्तर दिले.
लोकसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवीन कार्यालय मिळालं. काल त्याचं उद्घाटन झालं. तेव्हाही सगळे खासदार उपस्थित होते. आताही सर्व 9 खासदार हजर आहेत. आणि म्हणून आम्ही मुद्दाम सर्वांना एकत्र आणलं. आमची वज्रमूठ मजबूत आहे. टायगर झिंदा है. टप्प्या-टप्प्याने त्यांच्यातलीच (शिंदे गट) माणसं तिकडे जाणार होती, माहिती आहे का? संजय राऊतसाहेबांनी सांगितलं होतं. त्यांच्यातलाच माणूस काही आमदारांना घेऊन जातोय, अशी बातमी होती. पुढे काय झालं? त्यावरून लक्ष भरकटवायचं म्हणून आमच्यावर यायचं. म्हणे शिवसेना… यांचे खासदार चालले, अशा अफवा पसरवल्या जात असल्याचे अरविंद सावंत म्हणाले.
आमच्या खासदारांबद्दल त्यांच्या निष्ठेबद्दल जनमाणसामध्ये मनं कलुशित करण्याचा जो प्रकार आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. एका निष्ठेने सर्व माणसं इथे राहिलेली आहेत. सर्व संकटाच्या प्रसंगात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिलेले हे सर्व खासदार आहेत. आणि तिकडे काहीही होऊ द्या, आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहोत. त्यामुळे ज्या कोणी बातम्या सोडताहेत त्यांनी सर्व खासदारांची ही एकजूट बघावी, असे प्रत्युत्तर अरविंद सावंत यांनी दिले.
आम्ही कुठेही जाणार नाही. पण पंतप्रधानांचा हिंदुत्वाचा मुद्दा कुठे आहे ते कळू द्या. बांगलादेशात काल पुन्हा हिंदूंवर हल्ले झाले, आवाज नाहीत काढत. मणिपूरमध्ये महिंलावर अत्याचार झाले. आणि हिंदुस्थानातील आपल्या माणसांना बेड्या ठोकून 45 तास ज्या पद्धतीने देशात आणलं गेलं, हा देशाचा अपमान आहे. अमेरिकेचं विमान उतरवू देणं हाच देशाचा अपमान आहे. दुसरीकडे पंतप्रधान कुंभमेळ्यात गंगा नदीत डुबकी घेत आहेत. ही डुबकी कशाला? तर दिल्लीत मतदान होत आहे म्हणून. निवडणुकीशिवाय भाजपचं हिंदुत्व वैगरे काही नाही. हिंदुत्व महत्त्वाचं नाही, त्यांना फक्त सत्ता हवी आहे. सगळी नोकरशाही त्यांच्या दावणीला बांधलेली आहे, असा हल्लाबोल अरविंद सावंत यांनी केला.