सोनी मराठी वाहिनी गेल्या सहा वर्षांपासून सतत नवनवीन विषयांवर निरनिराळ्या मालिका आणि कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. हे कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीला नेहमीच उतरतात आणि प्रेक्षकांच्या मनात घरही करतात. यातच भर घालण्यासाठी सोनी मराठी वाहिनी एक नवा कार्यक्रम घेऊन येत आहे. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ असं या कार्यक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमाद्वारे टेलिव्हिजनच्या जगतात कधीही न झालेलं एक अद्भुत शोधपर्व सुरु होणार आहे.
महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात थोर आणि महान संतांनी जन्म घेतला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर होत असलेल्या भक्तिरसपूर्ण, कथारूप, एकपात्री निवेदनाला कीर्तन असं म्हणतात आणि हे करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार. कीर्तनाची वैभवशाली परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे आणि असेच हजारो कीर्तनकार महाराष्ट्रात कीर्तन परंपरा जपण्यासाठी कीर्तन शिकत आहेत.
हे सुद्धा वाचा
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार?’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सोनी लिव्हवर 7 फेब्रुवारीपासून 27 फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणार आहे. 12 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असलेला प्रत्येक स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो. या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी सगळ्यात आधी सोनी लिव्ह अँप डाऊनलोड करा. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’च्या पेज वर जाऊन रजिस्ट्रेशनला सुरुवात करा. आवश्यक ती माहिती भरा आणि नियम व अटी मंजूर करून पुढे जा. आपला कीर्तनाचा 1 ते 2 मिनिटांचा ऑडिशन व्हिडीओ अपलोड करा आणि आपले ऑडिशन पूर्ण करा.
टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच कीर्तनकारांवर आधारित रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कीर्तनाची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात कीर्तनकारांसाठीचा हा कार्यक्रम ही एक सुवर्णसंधी ठरेल. इतकंच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कीर्तनकार शोधले जाणार आहेत. महाराष्ट्रात कीर्तन परंपरा वर्षानुवर्षं सुरु आहे. हीच कीर्तनपरंपरा आणि कीर्तनाचा वारसा असाच पुढे वृद्धिंगत व्हावा यासाठी ‘सोनी मराठी वाहिनी’ हा नवा कार्यक्रम घेऊन येत आहे. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी सोनी लिव्ह या ऍपवर नोंदणी करावी लागणार आहे.