महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज देशाची राजधानी दिल्ली येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाराष्ट्रात जवळपास 39 लाख मतं अधिकची होती असं म्हणत आता ही मतं दिल्ली मार्गे बिहारमध्ये जाणार असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला टोले लगावत खरपूस समाचार घेतला. तसेच राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या गंभीर मुद्द्यावर आयोगानं उत्तरं द्यावीत, अशी विनंती देखील केली.
‘या देशाचा निवडणूक आयोग जर जिवंत असेल, त्यांच्यातला विवेक मेलेला नसेल तर त्यांनी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यावी. मात्र निवडणूक आयोग याची उत्तरे देणार नाहीत, कारण निवडणूक आयोग हे स्थापन झालेल्या सरकारचा गुलाम झाला आहे. आम्ही वारंवार निवडणूक आयोगाला आवश्यकती माहिती दिली आहे. मात्र ते मेले आहेत. तसेच जी 39 लाख मतं आली आहेत ती कुठून आली आहेत आणि आता कुठे जाणार आहेत? तर ती आता बिहारमध्ये जाणार आहेत. ही फ्लोटिंग मतं आहेत. तिच नावं, तेच आधारकार्ड असेल, सगळं तसंच असेल. ते फिरत असतात. थोडे दिल्लीत आले आहेत. आता ही 39 लाख मतं बिहार मध्ये जातील. त्यानंतर उत्तर प्रदेशात जातील. हा एक नवा पॅटर्न बनला आहे. याच पॅटर्नने हे लोक निवडणुका लढत आहेत आणि जिंकत आहेत’, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.
आज राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्यात आले असून हा अत्यंत गंभीर मुद्दा देशासमोर मांडत असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
‘या देशात लोकशाही, संसद, विधानसभा जिवंत ठेवायची असेल तर या प्रश्नांची उत्तरं आम्ही मागणार असं नाही तर मीडियानं मागितली पाहिजे. लोकांमध्ये जागृती आली पाहिजे’, असंही संजय राऊत म्हणाले.
आम्ही तर लढणारे लोक आहोत, लढणारच. पण महाराष्ट्रात ते कसे जिंकले आणि आम्हाला कशा प्रकारे हरवण्यात आलं हा मुद्दा राहुल गांधी यांनी देशासमोर आणल्याचं राऊत यांनी सांगितलं.
निवडणून आयोगानं जागं व्हावं, त्यांनी जो पडदा ओढला आहे तो बाजूला करावा. सरकारने त्यांच्यावर जे कफन टाकले आहे ते बाजूला सारून या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावी, अशी विनंती करत असल्यांच संजय राऊत म्हणाले.