मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल ५ लाख महिला अपात्र झाल्या आहेत. शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तर ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणं सुरूच राहणार आहे. यासंदर्भात आदिती तटकरे यांनी एक ट्वीट देखील केले आहे. ‘दिनांक २८ जून २०२४ आणि दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.’ तर पुढे असेही म्हटले की,
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण हे असे असणार आहे.
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २,३०,०००
वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – १,१०,०००
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,०००
एकूण अपात्र महिला – ५,००,०००
सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द असल्याचेही आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.