प्रादेशिक अधिकारीपदाचा निर्णय उद्योगमंत्री, महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर घेतला जाणार असला तरी, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचीही शिफारस महत्त्वपूर्ण ठरणार आहे. File Photo
Published on
:
07 Feb 2025, 4:48 am
नाशिक : मागील काही महिन्यांपासून मुंबई मॅटमध्ये नाशिक एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी (आरओ) पदाची सुनावणी सुरू होती. या सुनावणी प्रक्रियेची जवळपास पूर्ण झाली असून, अंतिम निर्णय आता मंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात नाशिकसह अहिल्यानगर एमआयडीसी प्रादेशिक अधिकारीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या मते, नाशिकला दीपक पाटील यांची नियुक्ती जवळपास निश्चित आहे, तर नगरला गणेश राठोड यांची नियुक्ती केली जाणार आहे.
नाशिकच्या प्रादेशिक अधिकारीपदी असलेल्या नितीन गवळी यांची ३१ जुलै २०२४ राेजी बदली झाल्यानंतर रिक्त जागेवर गणेश राठोड यांची वन व महसूल विभागाने नियुक्ती केली होती. मात्र, त्यांच्या नियुक्तीला एेनवेळी स्थगिती देत, दीपक पाटील यांच्या नियुक्तीचे नव्याने आदेश निघाले. याविरोधात राठोड यांनी मुंबई मॅटमध्ये धाव घेतली. त्यानंतर मागील काही महिन्यांपासून मॅटमध्ये याबाबतची सुनावणी सुरू होती. दरम्यान, मॅटने याप्रकरणी नाशिक आणि नगरमध्ये दोन्ही अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबतचा तोडगा सुचविताना, याबाबतचा निर्णय उद्योग विभागावर सोपविला होता. तसेच १६ जानेवारीपर्यंत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या काळात उद्योगमंत्र्यांसह 'एमआयडीसी'चे सर्वच प्रमुख अधिकारी दावोस दौऱ्यावर गेल्याने, ६ फेब्रुवारीपर्यंत नियुक्ती अहवाल सादर करण्याचे मॅटने स्पष्ट केले होते.
दरम्यान, उद्योग प्रधान सचिवास याबाबतचा अहवाल सादर करायचा असला तरी, उद्योगमंत्री आणि महसूलमंत्रीच याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या आठवड्यात दोन्ही मंत्री मुंबईत नसल्याने, पुढील आठवड्याच्या प्रारंभी अधिकारी नियुक्तीचे आदेश पारित केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मंत्री महाजन यांची कोणास पसंती?
प्रादेशिक अधिकारीपदाचा निर्णय उद्योगमंत्री, महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर घेतला जाणार असला तरी, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचीही शिफारस महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सूत्रानुसार, मंत्री महाजन यांनी दीपक पाटील यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याने, त्यांचीच नाशिक प्रादेशिक अधिकारीपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तर राठोड यांनी यापूर्वीच नगरचे प्रादेशिक अधिकारी पद स्विकारण्याबाबत उद्योग विभागाला पत्र दिल्याची माहिती समोर येत आहे.