उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात काटोल शहरातील सीसीटीव्हीवरून वाद File Photo
Published on
:
07 Feb 2025, 8:03 am
Updated on
:
07 Feb 2025, 8:03 am
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : काटोल शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी निधी सुध्दा मंजुर करण्यात आला होता. परंतु, राज्यात भाजपचे सरकार आले आणि सीसीटीव्ही लावण्याचे काम थंड बस्त्यात गेले. या कामाचे श्रेय अनिल देशमुख यांना मिळू नये, यासाठी हे काम रद्द करण्यात आले.
हा प्रश्न सामान्य जनतेशी निगडित असल्याने राजकीय द्वेषपोटी काटोलमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव रद्द करु नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवानेते सलील देशमुख यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. एकंदरीत आजी -माजी गृहमंत्र्यांचे पुन्हा एकदा निवडणुकीनंतरही आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
काटोल शहराची लोकसंख्या आता झपाट्याने वाढत आहे. तसेच तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे परिसरातील लोकांचा वावर काटोल शहरात जास्त प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे लोकांच्या सुरक्षेकरीता काटोल शहराला सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पाचा गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. हा प्रस्ताव तयार करुन तो राज्य शासनाला सादर करण्यात आला. यानंतर गृह विभागाकडून मान्यता देण्यात आली. या कामासाठी 9 कोटी 75 लाखांचा निधी मंजूर झाला होता, असा दावा सलील देशमुख यांनी पत्रात केला आहे.