बारामतीत शासकीय तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीFile Photo
Published on
:
07 Feb 2025, 7:46 am
Updated on
:
07 Feb 2025, 7:46 am
बारामती: हमी भावापेक्षा कमी दर तुरीला मिळत असल्याने बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने सादर केलेल्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय झाला. परिणामी आता हमी दराने तूर खरेदीसाठी शेतकर्यांची नोंदणी सुरू झाली आहे, अशी माहिती समितीचे सभापती विश्वासराव आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी दिली.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावात तुरीचे दर हमी भावापेक्षा कमी निघत असल्याने समितीने केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता.
हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाच्या पीएसएस योजनेंतर्गत तूर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने दिल्या आहेत. त्यानुसार 22 फेब्रुवारीपर्यंत तूर उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले आहे.
केंद्र शासनाने तुरीचा हमीदर 7 हजार 550 रुपये असा निश्चित केला असल्याने याच दराने वाळलेली व स्वच्छ केलेली तूर खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकर्यांनी नाव नोंदणी ऑनलाइन करावयाची आहे.
तूर खरेदी केंद्रावर नोंद करण्यासाठी जमिनीचा सात-बारा उतारा व त्यावर तुरीची नोंद असलेला सन 2024-25 पीकपेरा, आठ-अ, आधारकार्ड आणि आयएफएसआय कोडसह बँकेचे पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर इत्यादी संपूर्ण कागदपत्रे शेतकऱ्यांना सादर करावी लागणार आहेत.
शेतकर्यांनी बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघ येथे ऑनलाइन नोंदणी करावयाची आहे. नोंदणी केलेल्यांची तूर खरेदी करण्यात येणार असल्याने मुदतीत नोंदणी करावी. खरेदी सुरू झाल्यानंतर मुदतीत नोंदणी केलेल्या शेतकर्यांना एसएमएसद्वारे कळविणेत येईल, त्याचवेळी तूर खरेदी केंद्रावर तूर आणताना शासनाचे निकषाप्रमाणे एफएक्यू दर्जाचा व स्वच्छ आणि वाळवून माल आणावा. तुरीची तपासणी करून तूर खरेदी करण्यात येईल, अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.