बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान हा सर्वांत लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता असते. अशातच सलमानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 2017 मध्ये पत्रकार रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या मुलाखतीत सलमानने त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल उत्तर दिलं होतं. त्यावेळी त्याने बीफ (गोमांस) आणि पोर्क (डुकराचं मांस) खात नसल्याचं स्पष्ट केलं होतं. “मी सर्वकाही खातो, पण बीफ आणि पोर्क कधीच खात नाही”, असं तो म्हणाला होता.
याबद्दल सलमानने पुढे सांगितलं, “गाय आमचीसुद्धा माता आहे. गाईला मी माझ्या आईसमान समजतो, कारण माझी स्वत:ची आई हिंदू आहे. माझे वडील मुस्लीम आहेत. माझी दुसरी आई हेलन ख्रिश्चन आहे. आम्ही पूर्ण हिंदुस्तान आहोत.” सलमानचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांनी दोन लग्न केले आहेत. 18 नोव्हेंबर 1964 रोजी त्यांनी सुशीला चरक (लग्नानंतर सलमा खान) यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र विवाहित असतानाही त्यांचं अभिनेत्री हेलन यांच्याशी अफेअर होतं. पत्नी आणि मुलांना याबद्दलची माहिती देऊन 1981 मध्ये सलीम खान यांनी हेलनशी दुसरं लग्न केलं.
हे सुद्धा वाचा
सलमान खान मुस्लीम जरी असला तरी त्याच्या कुटुंबात सर्व धर्माचे सण-उत्सव उत्साहात साजरे केले जातात. सलमानच्या घरी दरवर्षी गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. सलमानसह त्याचे कुटुंबीय मनोभावे पूजा-अर्चना करतात. सलमानचा भाऊ अरबाज खानची पूर्व पत्नी मलायका अरोरा हिंदूच आहे. तर दुसरा भाऊ सोहैल खानचीही पूर्व पत्नी सीमा सजदेह ही हिंदू आहे.
सलमानच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झाल्यास, तो लवकरच ‘सिकंदर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ए. आर. मुरुगादोस या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. यामध्ये सलमानसोबतच रश्मिका मंदाना, शर्मन जोशी, सत्यराज आणि अंजिनी धवन यांच्या भूमिका आहेत. साजिद नाडियादवाला निर्मित हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शितत होणार आहे. या चित्रपटात सलमान खान दुहेरी भूमिका साकारणार आहे.