लोकनायक प्रकाश पोहरे यांचा सवाल ?
वर्धा (Wardha):- लहान राज्यांसह जिल्हेसुद्धा प्रशासकीय संपर्कासह विकासाकरिता चांगली राहतात, ही बाब सिद्ध झाली आहे. सरकार महाराष्ट्रात नवीन जिल्ह्यांच्या
निर्मितीची घोषणा करणार आहे, मग महाराष्ट्रात तीन नवीन राज्यांच्या निर्मितीची घोषणा कधी करणार, असा सवाल जनलोकनायक प्रकाश पोहरे (Prakash Pohare)यांनी विचारला असून सरकारने नवीन जिल्ह्यांच्या घोषणेसोबतच महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, कोकण, या नवीन राज्यांच्या निर्मितीची घोषणा करावी, अशी मागणी जनलोकनायक प्रकाश पोहरे यांनी केली.
जनतेची प्रशासकीय फरफट थांबवावी
मी नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीला उपयुक्त प्रशासकीय बाब समजतो. राज्येच काय, जिल्हेसुद्धा जेवढे लहान राहतील, तेवढा जनतेचा प्रशासनासोबत संबंध वाढून जनतेच्या समस्या सुटायला हातभार लागेल. त्यामुळेच महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, कोकण, अशी तीन नवीन राज्ये निर्माण करून विकासाला गती द्यावी, जनतेची प्रशासकीय फरफट थांबवावी, महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्यांच्या घोषणेसोबतच विदर्भ, मराठवाडा, कोकण या तीन राज्यांच्या निर्मितीची घोषणा सरकारने करावी, अशी आग्रही मागणी जनलोकनायक प्रकाश पोहरे यांनी केली आहे.
लहान राज्ये असली तरच विकास
देशात पुन्हा २५ नवीन राज्ये निर्माण झाली पाहिजेत, उत्तर प्रदेशच्या विकासाकरिता याच राज्यात ६ नवीन राज्ये निर्माण होणे गरजेचे आहे, हे स्पष्ट करताना जनलोकनायक पोहरे म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत लहान राज्ये असली तरच विकास होतो. हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्याची तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनात जास्त खासदारांच्या बसायची व्यवस्था करून केलेलीच आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे देशात लहान राज्ये निर्मितीचा अगत्याने विचार करून त्याबाबत घोषणा करतील अशी अपेक्षाही प्रकाश पोहरे यांनी व्यक्त केली आहे, मोठ्या राज्यात प्रशासनिक संपर्कवेळीच होत नसल्याने या मोठ्या राज्यांचा विकास खुंटला असल्याचे केंद्र शासनाच्या लक्षात आलेच आहे.
या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा अपेक्षित
महाराष्ट्रात २१ नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा सरकार करेल, असे समजले जाते. त्याच जोडीला विदर्भ, मराठवाडा तसेच कोकण या तीन नवीन राज्यांच्या निर्मितीची घोषणा केली जाणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्यात जळगाव जिल्हा विभाजनातून भुसावळ, लातूर जिल्हा विभाजनातून उदगीर, बीड जिल्हा विभाजनातून अंबेजोगाई, नाशिक जिल्हा विभाजनातून मालेगाव, कळवण, नांदेड जिल्हा विभाजनातून किनवट, ठाणे जिल्हा विभाजनातून कल्याण, सांगली, सातारा, सोलापूर जिल्हे विभाजनातून माणदेश, पुणे जिल्हा विभाजनातून बारामती, बुलडाणा जिल्हा विभाजनातून खामगाव, यवतमाळ जिल्हा पुसद, पालघर जिल्हा विभाजनातून जव्हार, अमरावती जिल्हा विभाजनातून अचलपूर, भंडारा जिल्हा विभाजनातून साकोली, रत्नागिरी जिल्हा विभाजनातून मंडणगड, रायगड जिल्हा विभाजनातून महाड, अहमदनगर जिल्हा विभाजनातून शिर्डी, श्रीरामपूर, तसेच गडचिरोली जिल्हा विभाजनातून अहेरी या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा अपेक्षित आहे. सोबतच महाराष्ट्राच्या जिल्हे विभाजनातून विदर्भ, मराठवाडा, कोकण राज्यांची निर्मिती व्हावी, अशी मागणी पोहरे यांनी केली आहे.