दहा दिवस "आई जगदंबा उदो उदो'चा गजर:आजपासून मोठ्या देवीच्या शांती उत्सवाला भक्ती भावात होणार प्रारंभ

2 days ago 1
राज्यातून केवळ खामगाव शहरात साजरा होणाऱ्या श्री जगदंबा देवीच्या शांती उत्सवाला उद्या १६ ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमे पासून सुरूवात होणार आहे. हा उत्सव दहा दिवस साजरा केला जाणार असून श्री जगदंबा उत्सव मंडळाच्या वतीने जगदंबा देवीची उद्या १६ ऑक्टोबर रोजी विधिवत पूजा-अर्चा करून रात्री नऊ वाजे नंतर देवी समोरून पडदा उघडून भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे. देवीच्या मंडप परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून पुरूष व महिलांना दर्शनासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील जगदंबा चौकातील जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने बसवण्यात येणारी देवी ही मोठी देवी म्हणून राज्यासह परराज्यात ओळखली जाते. या देवीला ११६ वर्षांची परंपरा लाभली आहे. केनन्ना परशुराम आनंदे यांनी १९०८ साली कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी देवीची स्थापना केली होती. कोरोनाचे दोन वर्षे वगळता तेव्हापासून आज पर्यंत हा उत्सव शहरात मोठ्या भक्ती भावाने व श्रद्धेने साजरा करण्यात येत आहे. यंदा देवीचा उत्सव हा दहा दिवस राहणार आहे. या उत्सवा दरम्यान शहरात भक्तिमय वातावरण राहणार आहे. सकाळी साडे सात वाजता व रात्री आठ वाजता मंगल वाद्यांसह देवीची आरती हजारो भाविकांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सत्य नारायणाची पूजा करण्यात येणार आहे. तर २६ ऑक्टोबर रोजी देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. देवीच्या मूर्तीचे विसर्जन जनुना तलावात करण्यात येणार आहे. विजयादशमीला असुरांचा संहार करून जेव्हा देवी परत येते, त्यावेळी ती क्रोधित असल्याने तिचा चेहरा लाल झालेला असतो.त्यामुळे या देवीचा चेहरा लाल रंगाचा करण्यात येतो. देवीला शांत करण्यासाठी पूजा-अर्चा, आराधना, आरती व जयजयकार करून मातेला शांत करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. नवसाला पावणारी म्हणून या मोठ्या देवीला ओळखले जाते. जगदंबा उत्सव काळात राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी येत असतात. साईबाबा चौकात ओटी, साड्या, प्रसाद, नारळ, हार व इतर साहित्याची दुकाने थाटण्यात आली आहेत. या उत्सव काळात देवीचा दरबार चोवीस तास खुला राहणार असल्याची माहिती रवि आनंदे यांनी दिली. हा उत्सव साजरा करण्यासाठी देवीचे भक्त परिश्रम घेत आहेत. शिवाय अनेक भाविक या ठिकाणी आपली सेवा देणार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article