दिव्य मराठी विशेष:लोकांमधली दानत संपली, वासुदेवाला दान पावतच नाही

2 days ago 1
पापरी ''दान पावलं बाबा दान पावलं...वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला..'' असे म्हणत गावांमधील वाड्यावस्त्यांवर सकाळच्या वेळी घरोघरी हिंडत आपली उपजीविका करणारे वासुदेव काळाच्या ओघात ग्रामीण भागात आता कमी दिसू लागले असून, लोकांमधील दानत कमी होऊ लागल्याने दिवसागणिक मिळणारे आर्थिक उत्पन्न आणि धान्य कमी प्राप्त होत असल्याची खंत शिराळा (ता. परंडा, जि. धाराशिव) येथील ७० वर्षीय वासुदेव त्र्यंबक नायकिले यांनी व्यक्त केली. पापरी (ता. मोहोळ) येथे नायकिले वासुदेव पेहरावात सोमवारी सकाळी घरोघरी फिरून गवळण, अभंग म्हणत फेरफटका मारत होते. ते म्हणाले, मी वयाच्या १७ व्या वर्षापासून वडिलोपार्जित परंपरेने डोक्यावर मोरपंखाची टोपी परिधान करत वासुदेवाचा पेहरावात गवळणी, अभंग गात, दान करणाऱ्या व्यक्तीच्या आई-वडिलांचा काव्यात्मक पद्धतीने उद्धार करत भिक्षा मागत गुजराण करत आहे. नवरात्र, दिवाळी उत्सवाच्या काळात आम्ही गावोगावी फिरत असतो. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन गावी परत जात असतो. वासुदेवाची परंपरा हजारो वर्षांपूर्वीची असून, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्या साहित्यात वसुदेवावरील रूपके आढळून येतात. एकेकाळी मला दिवसागणिक ४००-४५० रुपये रोख,तसेच ४० ते ५० किलो विविध धान्य दान स्वरूपात प्राप्त होयचे. आता दिवसागणिक २०० ते २५० रुपये व १५ ते २० किलो धान्य प्राप्त होत असल्याचे नायकिले यांनी सांगितले. ^बदलत चाललेला काळ, दान करण्यासाठी लोकांचा येणारा आखडता हात,त्यामुळे कमी होत चाललेले आर्थिक उत्पन्न व धान्य पाहता नवीन पिढी या परंपरेत पुढे येण्यास कुचरत आहे,त्यामुळे वसुदेवाची संख्या कमी होऊ लागली आहे,शासनाने आमच्याकडेही लक्ष द्यावे तरच पुढच्या पिढीला खरेखुरे वासुदेव पाहण्याचं भाग्य लाभेल अन्यथा त्यांना भविष्यात चित्रातच वासुदेव दाखवावा लागेल. -त्रिंबक नायकिले, वासुदेव

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article