Published on
:
18 Nov 2024, 2:14 pm
Updated on
:
18 Nov 2024, 2:14 pm
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यभरात विधानसभा निवडणुकीदरम्यान, प्रचाराचा झंझावात केला आणि एकूण 64 ठिकाणी त्यांच्या रॅली, रोडशो आणि सभा झाल्या. यातील दिवाळीनंतर झालेल्या 50 वर सभा त्यांनी अवघ्या 13 दिवसांत केल्या, म्हणजे सरासरी 4 सभा त्यांनी दररोज घेतल्या. आज (दि. 18) वर्धा जिल्ह्यात आर्वीत शेवटची सभा घेतली आणि प्रचाराची सांगता केली.
फडणवीस यांनी त्यांच्या प्रचाराचा हा प्रवास 25 पेक्षा अधिक जिल्ह्यात केला. उर्वरित जिल्ह्यांत व्हीडिओ संदेशाच्या माध्यमातून त्यांनी प्रतिनिधीत्त्व केले. या सभांमध्ये प्रामुख्याने शेतकर्यांसाठीच्या योजनांवर त्यांनी भर दिला. शेतकर्यांना मोफत वीज, दिवसा वीज, सौर कृषीपंप, एक रुपयांत पीकविमा, यासह सरकार येताच शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्यात येईल, किसान सन्मान निधी 12 हजाराचा 15 हजार करणार, एमएसपीवर भावांतर योजना लागू करून सोयाबीनला 6000 भाव देणार, खतांवरील राज्य जीएसटीचा परतावा असे अनेक मुद्दे मांडले.
लाडकी बहिण, लेक लाडकी, अर्ध्या तिकिटात एसटी प्रवास, 3 मोफत सिलेंडर, मुलींना मोफत उच्च शिक्षण, लखपती दिदी या महिलांसाठीच्या योजना त्यांनी भाषणातून मांडल्या. लाडक्या बहिणींना आता 1500 वरून 2100 रुपये देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच स्थानिक सिंचनाचे प्रकल्प, उद्योग, रोजगार इत्यादींबाबत त्या त्या मतदारसंघात सरकारने काय काम केले, अशा बहुतेक स्थानिक मुद्यांवर त्यांनी भर दिला.