देवेंद्रांच्या पीएसाठी तिकीट कापलेल्या केचेंचा संन्यास:आर्वीत प्रचार केला नसल्याचा सुरू होता आरोप
3 hours ago
1
४२ वर्षे भाजपत काम केलेले आर्वीचे मावळते आमदार ७१ वर्षीय दादाराव केचे यांनी शुक्रवारी राजकीय संन्यासाची घोषणा केली. ते पुन्हा विधानसभा लढण्याची तयारी करत असताना देवेंद्र फडणवीसांचे पीए सुमीत वानखेडे यांना तिकीट देण्यात आले. त्यानंंतर केचेंना अमित शाह यांनी पुनर्वसनाचा शब्द दिला. त्यामुळे त्यांनी तिकीट कापल्याचा राग बाजूला ठेवून प्रचार केला तरीही त्यांच्यावर पक्षासाठी काम केले नाही, असा ठपका ठेवण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी नाराज होऊन यापुढे राजकीय नव्हे, सामाजिक काम करणार असल्याचे जाहीर केले. तत्पूर्वी त्यांनी ‘मी पक्षासाठी मनापासून काम केले. त्यांना आता हनुमानासारखी छाती फाडून दाखवू का,’ असा सवाल पक्षांतर्गत विरोधकांना केला. ते म्हणाले की, भाजपमध्ये मी १९८२ पासून कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. आर्वीत कधीच कमळ फुलणार नाही अशी चर्चा असताना २००९, २०१९ मध्ये विजयी झालो. २०२४ साठी उमेदवारी देण्यात येणार असे आश्वासन प्रमुख नेत्यांकडून दिले जात होते. मात्र मोठे षड््यंत्र रचून तिकीट कापले गेले. अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज अनेकांच्या मनधरणीनंतर मागे घेतला. वानखेडेंसाठी तन-मन- धनाने काम केले. आता माझ्याविरुद्ध अपप्रचार होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणे ही सर्वात मोठी चूक झाली. म्हणून भाजपमधून बाहेर पडत राजकारणातून कायमस्वरूपी संन्यास घेत आहे. माझ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार रुजले आहेत. त्यावर पावले टाकत सामाजिक कार्य करीत राहणार आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)