दोन दिवस ‘येलो अलर्ट’; पारा 6 अंशांनी घसरणार:तापमान 12 अंशावर, हवामान विभागाचा 28 व 29 नोव्हेंबरदरम्यान थंडी वाढणार
2 hours ago
2
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या २७ दिवसांत तापमानाचा पारा १० अंशानी घसरला असून, बुधवारी (२७ नोव्हेंबर) शहराचे किमान तापमान १२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. गेल्या आठवड्यात ११.६ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवले होते. दोन दिवसांपूर्वी १० अंश सेल्सियस तापमान नोंदवले होते. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने शहरासह जिल्ह्यात पुढचे दोन दिवस थंडीचा ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, आणखी ६ अंशाने तापमान घसरण्याची शक्यता वर्तवली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहराचे किमान तापमान २० अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले होते. त्यानंतर तापमानाचा पारा १७ अंश सेल्सिअस होता. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात शहराचे किमान तापमान १७ अंश सेल्सिअस होते. मात्र, यंदा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यातच शहराचे किमान तापमान ११ अंशापर्यंत घसरले आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमानात घसरण होण्यास सुरुवात झाली. ९ नोव्हेंबर किमान तापमान १९.५, तर कमाल तापमान ३१ अंश होते. १० रोजी किमान १८, तर कमाल २९ अंश तापमान झाले. मंगळवारी (१९ नोव्हेंबर) शहर व परिसरात सर्वात कमी किमान तापमान ११.६ नोंदवण्यात आले होते. बुधवारी (२० नोव्हेंबर)ला १५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले होते. गुरुवारी किमान १५ कमाल २९ अंश इतके तापमान नोंदवले होते. सोमवारी १० अंश सेल्सिअस तापमान झाले होते. बुधवारी पारा १२ अंशांवर होता. पारा घसरल्याने गारठा प्रचंड वाढला आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. शहरात थंडीच्या पार्श्वभूमीवर उबदार कपड्यांची दुकाने सुरू झाली आहेत. थंडी बरोबरच बुधवारी दिवसभर कडक उन्हाबरोबर उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे गारठा वाढला होता. दरम्यान भारतीय हवामान विभागाने २८,२९ नोव्हेंबरला शहर व जिल्ह्यात थंडीचा येलो अलर्ट जारी केला असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)