नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. महायुतीने 288 पैकी 230 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे. महायुतीमध्ये सहभागी असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही दमदार कामगिरी केली. लोकसभा निवडणुकीत अवघी एक जागा जिंकणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत 41 जागा जिंकण्याचा करिष्मा केला. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत आपले काका म्हणजे शरद पवार यांच्यावर एकप्रकारे मात केली. कारण यंदाच्या विधानसभेला राष्ट्रवादीच्याच दोन गटांमध्ये मुख्य सामना होता. शरद पवार यांच्या पक्षाला फक्त 10 जागा जिंकता आल्या. या यशामुळे अजित पवार यांचा दबदबा वाढला आहे. भविष्यातही आता अजित पवार यांच्यासमोर चांगल्या संधी असतील. प्रतिष्ठेच्या या लढाईत त्यांच्या पक्षाने बाजी मारली. पण या भव्य विजयानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह समोर आला आहे.
अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी सोशल मीडियावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना समज दिली आहे. NCP च्या विजयानंतर डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांनी अजित पवारांना शुभेच्छा देताना त्यांच्या खाद्यांवर हात ठेवून फोटो काढला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला. “अरोराची अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवायची हिंमत कशी झाली?” असा मिटकरींनी जाब विचारला. “विधानसभा निवडणुकीतील विजय हे अजित पवारांच्या मेहनतीचं फळ आहे. गुलाबी रंगाची कोणतीही जादू नव्हती. दादांच्या खांद्यावर हात पाहून मनाला वेदना झाल्या. माझ्यासारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या दादांचा सैनिक हे माफ करणार नाही”. मात्र काही वेळाने मिटकरी यांनी ही पोस्ट एक्सवरून डिलीट केली.
It is highly unfortunate that Mr. @AmolMitkari22 contempt being a enactment MLC, has chosen to instrumentality an anti-party stance regarding the relation of @DesignBoxed and Sh. Naresh Arora. My enactment and my father, Sh. @AjitPawarSpeaks, the National President of the party, categorically does not…
— Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) November 27, 2024
पार्थ पवार काय म्हणाले?
अमोल मिटकरी यांनी जाहीरपणे अशा भावना व्यक्त केल्यानंतर पार्थ पवार यांनी त्यांना खडसावलं. “अमोल मिटकरी हे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार असून त्यांनी डिझाईन बॉक्स आणि नरेश अरोरा यांच्याबद्दल बोलून पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. हे दुर्देवी आहे. माझा पक्ष आणि माझे वडील अजित पवार हे अमोल मिटकरींच्या मतांशी सहमत नाहीत. त्यांना विनंती आहे की, या प्रकरणात त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करु नयेत तसेच मीडियाला बाईट देऊ नयेत” असं पार्थ पवार यांनी त्यांच्या X वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हे पण तुम्ही आम्हाला सांगणार का..? मी जे वक्तव्य डिझाईन बॉक्स संदर्भात केलं ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रत्येकाचीच भावना आहे.आमचा साधा प्रश्न आहे,अजित दादांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी केली? हा महाराष्ट्र आहे चंदिगड नाही. चुक कबूल करा. #सॅलरीसोल्जर https://t.co/wZl7kOn7bj
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 26, 2024
विजयानंतर आता श्रेयवादाची लढाई
नरेश अरोरा यांची डिझाईन बॉक्स ही एक पब्लिक रिलेशन एजन्सी आहे. लोकसभेतील दारुण पराभवानंतर राष्ट्रवादीकडून या पीआर एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. या पीआर एजन्सीने गुलाबी रंगाची निवड केली. त्यानंतर राज्यभरात अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा सुरु झाली. राष्ट्रवादीकडून गुलाबी रंगाचा वापर आणि सकारात्मक मुद्यांभोवती प्रचार यामागे नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्सची कल्पना होती असं म्हटलं जातं. त्यामुळे या निवडणुकीतील विजयानंतर आता श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याच दिसत आहे.