धनंजय मुंडेंचे अंतर्मनातून वक्तव्य:दोष सिद्धच झाला नाही; बावनकुळे यांच्याकडूनही पाठराखण; तर राज ठाकरेंनाही प्रत्युत्तर
2 hours ago
1
राज्य म्हणून विचार केल्यास महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या पाहिजे, अशा स्पष्ट सूचना आम्ही राज्य म्हणून दिलेल्या आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काही निर्णय घेतला तर त्याबद्दल आम्ही एकत्र येऊन विचार करून निर्णय घेणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शक्यतो महायुती म्हणूनच लढणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून याबाबतचा निर्णय घेतला असल्याचे देखील बावनकुळे यांनी सांगितले आहे. अमरावती शहराचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्यांदाच अमरावती जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अमरावती जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेतला. अमरावती शहराच्या विकासासाठी सर्वत्र प्रयत्न करणार असल्याचा दावा यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. अमरावती शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचे सरकार म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. अमरावती जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे अंतर्मनातून बोलत आहेत धनंजय मुंडे यांनी स्वतः देखील हे मान्य केले आहे की, माझा एक टक्का जरी दोष असेल तर मी पक्ष सांगेल ते करायला तयार आहे. मात्र माझा दोष दाखवा, असे त्यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला जात आहे. त्यांना टार्गेट केले जात आहे, राजीनाम्याची मागणी केली जात आहे. ते भावनात्मक पद्धतीने अंतर्मनातून बोलत आहेत. मात्र या प्रकरणात जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही. तपासामध्ये तीन ते चार यंत्रणा काम करत आहेत. त्या तपासामधून काही भेटले तर त्याबाबतचा निर्णय होईल. मात्र, धनंजय मुंडे यांचा दोष आहे का? हे आधी सिद्ध करावे लागेल, असे देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. एखाद्या व्यक्तीशी संपर्कात असणे हा दोष नाही. वाल्मीक कराड यांचा परिचय असणे हा काही गुन्हा नाही. सोबत राहणाऱ्या एका कार्यकर्त्याने एखादी घटना केली असेल तर त्यात माझा दोष नसतो, असा दावा देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राज ठाकरे काँग्रेसच्या धोरणावर चालणार नाहीत लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला होता. राज्यातील 31 लोकसभा मतदारसंघात आमचा पराभव झाला. मात्र यातील ज्या आमच्या त्रुटी होत्या, ज्या आमच्या चुका होत्या, त्या 29 चुकांवर आम्ही काम केले. विधानसभा निवडणुकीतील या सर्व 29 विषयांवर काम केले. लोकसभा निवडणुकीतून आम्ही काही शिकलो. आणि त्यातूनच आमचा विजय झाला. विरोधी पक्षांनी देखील त्यातून काहीतरी धडा घ्यायला पाहिजे. त्यातून काही शिकले तर भविष्यात ते देखील विजयी होतील. मात्र, ते शिकण्यासही तयार नाही. राज ठाकरे यांना देखील या संदर्भात माझी विनंती आहे की, काँग्रेस पक्षाचे जे धोरण आहे, त्या धोरणावर राज साहेब यांच्यासारखे प्रगल्भ व्यक्ती जाणार नाही. अशी आमची भावना असल्याचे देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)