Ragging in college : प्रातिनिधिक छायाचित्र.File Photo
Published on
:
31 Jan 2025, 12:41 pm
Updated on
:
31 Jan 2025, 12:41 pm
वर्षा कांबळे
पिंपरी : राज्यातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थी रॅगिंगचे बळी ठरू नयेत, या हेतूने प्रत्येक विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये रॅगिंगविरोधी समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. तसे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) दिले आहेत. रँगिगच्या पार्श्वभूमीवर पूर्वीपासून महाविद्यालयांमध्ये अँटीरँंगिग समिती स्थापन केल्या आहेत. मात्र, या समित्या फक्त नावालाच केल्या असून समित्यांची वर्षभरात एकही बैठक झाली नाही. त्यामुळे ही समिती फक्त कागदावरच राहिली आहे.
शहरातील बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये आजही रँगिगच्या घटना घडतात. मात्र, त्याची वरवर दखल घेवून त्या मिटविल्या जातात. यामुळे रँगिगचा प्रसंग ओढवणार्या विद्यार्थ्यांचे एकतर शिक्षणाचे नुकसान होते किंवा त्याला अर्धवट शिक्षण सोडावे लागते. रँगिमुळे कॉलेजमध्ये जाण्याची भीती आणि अभ्यासावर होणारा परिणाम यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याविषयीची आत्मियता कमी होते. परिणामी विद्यार्थ्यांला इतर शाखेमध्ये प्रवेश घ्यावा लागतो.
शाळा संपल्यानंतर कॉलेजवयीन शिक्षणाविषयी विद्यार्थी आणि पालक यांनी नियोजन केलेले असते. शिक्षण संस्थेत पाल्याला चांगले शैक्षणिक वातावरण मिळावे, अशी पालकांची अपेक्षा असते. तसेच विद्यार्थ्यांला देखील चांगले मित्र मिळावेत व अभ्यासाचे वातावरण मिळावे अशी अपेक्षा असते. मात्र, सुरुवातीलाच रँगिगसारख्या प्रकारांनी एक तर विद्यार्थ्याला असुरक्षितता आणि अपमानितपणाची भावना निर्माण होते.
महाविद्यालयांमध्ये अँटी रँगिग समिती नेमल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या रँगिबाबत तक्रारी आल्यानंतर समितीकडून प्रतिबंधात्मक उपायोजना केल्या जातात. मात्र. समाजातील काही विशिष्ट व्यक्तींच्या दबावामुळे प्रकरणे वरवर हाताळली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांला न्याय मिळत नाही.
समितीच्या बैठका, चर्चा नाहीच
अँटीरॅगिंग कमिटीमध्ये स्थानिक नागरिक, पोलिस प्रशासन, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, अशासकीय स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींबरोबरच महाविद्यालयीन शिक्षक, पालक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थ्यांनाही प्रतिनिधित्व देणे बंधनकारक आहे. अँटि रँंगिग समितीच्या दोन महिन्यांतून एकदा तरी बैठक होणे गरजेचे असते. मात्र, समितीची वर्षभरात एकदाही बैठक होत नाही.
माझ्या मुलाला कॉम्प्युटर सायन्सला अकरावीला प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये काही विद्यार्थी कारण नसताना शिव्या देणे, डोक्यात सर्वांसमारे टपली मारणे व अपमानित करून त्याचा हसण्याचा विषय बनविणे असे प्रकार होऊ लागले. आम्ही अँटी रँंगिग समितीकडे तक्रार केली पण काही उपयोग झाला नाही. शेवटी आम्हाला मुलाचे कॉलेज बदलावे लागले.
छाया कदम, (पालक)