औंढा नागनाथ (Sarangwadi Sarpanch) : तालुक्यातील सारंगवाडी येथील सरपंचावर ग्रामपंचायत सदस्यांनी काही दिवसापूर्वीच अविश्वास ठराव पारित केला होता. परंतु सदरील सरपंच (Sarangwadi Sarpanch) जनतेतून निवडून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आज दिनांक 31 जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी ग्रामसभा घेऊन ग्रामसभेत नोंदणी झालेल्या ग्रामस्थांनी मतदान केले. यामध्ये विश्वास ठरावाच्या बाजूने व अविश्वास ठरावाच्या विरोधात अशी दोन चिन्हे मतदारांना दिली व दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले.
यानंतर झालेल्या मताची मतमोजणी करण्यात आली. यामध्ये 499 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात अविश्वास ठरावाच्या बाजूने 422 मते पडली तर अविश्वास ठरावाच्या विरोधात 51 मते पडली तर 26 मते बाद झाली त्यामुळे जनतेतून अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे पिठासीन अधिकारी बालाजी गोरे यांनी जाहीर केले. दरम्यान मतदान प्रक्रिया व सभा पार पाडण्यासाठी मंडळ अधिकारी रंगनाथ मेहत्रे, ग्राम महसूल अधिकारी गोपाल मुकीर, तलाठी ज्योती स्वामी, शेख जमीर, रामजी बर्वे, निवडणूक सहाय्यक नितीश कुलकर्णी, ग्रामसेवक कैलास देशमुख ग्रामसेवक गंगाधर हालबुर्गे,राम पायघन, कैलास जाधव, पिराजी हाके, उमाकांत मुळे, विनोद साळवे, राम चौधरी केशव काळे देविदास राठोड जीबी गायकवाड यांनी सहकार्य केले.
यादरम्यान अविश्वास ठराव मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी गुलाल उधळत फटाक्याच्या आतिषबाजी करत जल्लोष केला. यादरम्यान पोलीस निरीक्षक जीएस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी श्रीधर वाघमारे, यशवंत पवार जमादार बंडू घुगे सुभाष जैयताडे अमोल चव्हाण यांनी बंदोबस्त ठेवला होता.